एकनाथ खडसे जमीन व्यवहार प्रकरण : Zoting Committee च्या चौकशीचा अहवाल गहाळ ?; अनेक चर्चांना उधाण

टिओडी मराठी, मुंबई, दि. 13 जुलै 2021 – आपल्या पदाचा गैरवापर करुन पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीची जागा नातेवाईकांना दिल्याचा आरोप एकनाथ खडसे यांच्यावर होत आहे. या आरोपांनंतर तत्कालीन राज्य सरकारने या चौकशीसाठी झोटिंग समिती स्थापन केली होती. या समितीने एकनाथ खडसे यांना क्लीन चीट देखील दिली होती. मात्र, आता या चौकशीचा अहवालच गहाळ झाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.

एकनाथ खडसे भाजपमध्ये असताना त्यांना झोटिंग समितीने क्लीन चिट दिली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे हे भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आल्यावर या चौकशी समितीचा अहवाल गहाळ झालाय. हा अहवाल गहाळ झाल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

एकनाथ खडसे यांची चौकशी करण्यासाठी जस्टीस झोटिंग कमिटी नेमली गेली होती. त्यांनी ठरल्याप्रमाणे खडसे याना क्लीन चिट दिली. त्यानंतर तेव्हाच्या राज्य सरकाने एसीबीमार्फत पुण्यातील न्यायालयामध्ये या भ्रष्टाचार प्रकरणी खडसे यांना क्लीन चिट देऊन खटला बंद करावा, असा अर्ज केला होता.

त्यावेळी राज्यात आणि केंद्रात भाजप सरकार होते. यावेळी एकनाथ खडसे भाजपमध्ये होते. या पार्श्वभूमीवर जस्टीस झोटिंग आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी कामी मदत घ्यावी, असा लेखी अर्ज पुण्यातील न्यायालयात अंजली दमानिया यांच्या वतीने वकील असीम सरोदे यांनी दिलाय.

मात्र, ईडीकडून चौकशी सुरु :
एकनाथ खडसे यांना एसीबी, झोटिंग समितीने क्लीन चिट दिली गेलेली आहे. मात्र, काही महिन्यांपूर्वी एकनाथ खडसेंनी भाजपला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर या प्रकरणी ईडीने कारवाईला सुरुवात केली.

काही दिवसांपूर्वी या प्रकरणात खडसे यांच्या जावयाला ईडीने चौकशीसाठी बोलावले आणि त्यानंतर अटकही केले. मग, एकनाथ खडसे यांनाही ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 9 तास एकनाथ खडसे यांची चौकशी सुद्धा केली आहे.

Please follow and like us: