अशा मोडल्या देवेंद्र फडणवीस यांनी शपथा; Eknath Khadse, Nana Patole यांच्याकडून पोलखोल

टिओडी मराठी, दि. 29 जून 2021 – विरोधी पक्षनेते तथा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे नौटंकीबाज आहेत. खोटय़ा शपथा घेण्यात हुशार असून त्यांनी आतापर्यंत अनेकदा शपथा घेतल्या, भीष्मप्रतिज्ञा केल्या. परंतु त्या पूर्ण केल्या नाहीत. फडणवीस यांनी शपथा कशा मोडल्या? त्याची पोलखोल राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलीय. फडणवीस यांच्या वक्तव्याच्या जुन्या क्लिपही त्यांनी दाखवल्या आहेत.

नाना पटोले यांनी आज टिळक भवन येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

‘देवेंद्र फडणवीस म्हणजे खोटं बोलण्याचे मशीन आहे. खोटं बोला पण, रेटून बोला, ही त्यांची परंपरा आहे. फडणवीस यांनी पाच वर्षे खोटेपणा केलात. धनगर समाजाला आरक्षण देतो, असे सांगून त्यांची फसवणूक केली आहे.

मराठा समाजाचीही दिशाभूल केली व त्यांचे आरक्षण रद्द झाले आहे. आता सत्ता दिल्यास ओबीसींना ४ महिन्यांत आरक्षण मिळवून देतो, अन्यथा राजकीय संन्यास घेईन, असे म्हणत आहेत.

पण, त्यांनी ओबीसींचे आरक्षण काढले आहे. त्यांना आता बोलण्याचा अधिकार नाही. त्यांची नौटंकी आता महाराष्ट्राला समजली आहे. आता जनता फडणवीसांना संन्यास देईल.’ असे पटोले म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या जुन्या वक्तव्याची क्लिपही त्यांनी दाखवली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांच्या खोटेपणावर टीका केली.

फडणवीस यांची वक्तव्ये विश्वास ठेवण्यासारखी नाहीत. वेगळा विदर्भ होत नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्मप्रतिज्ञा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. परंतु ती मोडून त्यांनी लग्न केले, असे खडसे म्हणाले.

राष्ट्रवादीसोबत युती करणार नाही, असेही त्यांनी सांगितले होते. तरीही त्याच राष्ट्रवादी काँग्रेससोबत पहाटे शपथ घेतली, याचीही आठवण खडसे यांनी यावेळी करून दिली.

Please follow and like us: