MPSC ला आणखी कार्यक्षम बनवावे ; Devendra Fadnavis यांचा ठाकरे सरकारला सल्ला

टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 जुलै 2021 – एमपीएससीची परीक्षा देऊनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून स्वप्निल लोणकर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी एमपीएससीला अधिक कार्यक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करावा, असा सल्ला फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

पुण्यातील फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या स्वप्निल लोणकर या तरुणाने अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत एमपीएससीची परीक्षा दिली होती. त्यात तो उत्तीर्ण झाला होता. मात्र, यानंतरही त्याला नोकरी मिळाली नाही. या नैराश्यातून स्वप्निल लोणकरने गळफास घेऊन आत्महत्या केली.

एमपीएससीला स्वातंत्र्य हवं पण, स्वैराचार नको, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार आणि एमपीएससीच्या कारभारावर निशाणा साधला आहे.

एमपीएससीच्या कार्यप्रणालीचे पुनरावलोकन होण्याची गरज आहे. मोठ्या अपेक्षेने मुलं स्पर्धा परीक्षा देत असतात. दोन-दोन वर्षे मुलाखत होत नाही. म्हणून त्यांना ही निराशा येते. आम्ही एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे. पण, स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही.

एमपीएससीच्या संपूर्ण कारभाराचा पुन्हा आढावा घेऊन याला अधिक कार्यक्षम करता येईल, याचा प्रयत्न या ठाकरे सरकारने केला पाहिजे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिला आहे.

एमपीएससी बाबत राज्य सरकारने दुर्लक्ष करु नये. स्वायत्त संस्थेला पूर्ण स्वातंत्र्याने काम करायला द्यावे. परीक्षा पास झाल्यानंतर दोन वर्षे मुलाखती होत नाहीत. पोस्टिंग मिळत नाही म्हणून झालेल्या आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. अनेक तरुण यामुळे भरडले जात आहेत, असे फडणवीस म्हणाले.

Please follow and like us: