TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 14 जुलै 2021 – महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांना ईडीने समन्स बजाविले आहे. त्यांना गुरुवारी (दि. 15) सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, सध्या कोरोनामुळे सगळं ऑनलाईन सुरु आहे. त्यामुळे ऑनलाईन चौकशी करावी, अशी देखील मागणी केली आहे.

सीबीआयने आपल्याविरोधामध्ये दाखल केलेला गुन्हा रद्द व्हावा, यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. न्यायालयाने या याचिकेचा निकाल राखून ठेवला आहे. मात्र, अद्याप ईडी याची चौकशी करत आहे.

ईडीने आतापर्यंत देशमुख यांच्यासह त्यांचा मुलगा ऋषिकेश, त्यांची पत्नी आरती यांना समन्स बजावले आहेत. मात्र, त्यांच्यापैकी कोणीही अद्याप चौकशीला सामोरे गेले नाही.

याबद्दल देशमुख यांचे वकील कमलेश घुमरे म्हणाले, ईडीला आम्ही वारंवार पत्राद्वारे विनंती केली आहे की, तुम्हाला जे काही हवं आहे ते सांगा आम्ही देऊ. तसेच सध्या करोनाच्या परिस्थितीमुळे जर सगळं ऑनलाईन सुरूय तर चौकशीही ऑनलाइन माध्यमातून घ्यावी, अशी आम्ही मागणी केलीय.