टिओडी मराठी, दि. 7 ऑगस्ट 2021 – उत्तराखंडमध्ये कुंभमेळ्यावेळी कोरोना चाचण्यांत झालेला घोटाळा आता समोर येतोय. हिसारच्या नलवा लॅबोरेट्रीवर शुक्रवारी सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडी अधिकाऱ्यांच्या पथकानं छापा टाकला आहे.
सकाळी सात वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू असलेल्या या तपासादरम्यान ईडीने अनेक कागदपत्रांची पडताळणी केली. हिसार आयएमएच्या डॉ. जेपीएस नलवा आणि त्यांच्या मुलालाही ईडीकडून अनेक प्रश्न विचारले. ईडीने आता याप्रकरणी मोठे खुलासे केलेत. शुक्रवारी ईडीने दिल्लीपासून देहरादून पर्यंत अनेक खासगी लॅब आणि त्यांच्या संचालकांच्या ठिकाणावर छापे टाकले आहेत.
याबाबत ईडीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिसारच्या नलवा लॅबने बनावट बिलांच्या माध्यमातून उत्तराखंड सरकारला साडेतीन कोटी रूपयांला फसविले आहे.
नोवस पॅथ लॅब्स, डीएनए लॅब्स, मॅक्स लॅबोरेट्री प्रायव्हेट लिमिटेड, डॉ. लाल चांदनी प्रायव्हेट लिमिटेड आणि नलवा लॅबच्या कार्यालयांवर आणि देहरादून हरिद्वार, नोएडा, दिल्ली आणि हिसारमध्ये त्यांच्या संचालकांच्या रहिवासी ठिकाणांवर छापे टाकले आहेत.
या छाप्यावेळी अनेक दस्तऐवज, बनावट बिल, लॅपटॉर आणि संपत्तीचे दस्तऐवज आणि ३०.९ लाख रूपये रोख जप्त केलं आहे, असे ईडीनं सांगितलं.
उत्तराखंड पोलिसांकडून याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. तसंच या प्रकरणांत बनावट चाचण्यांच्या आधारे अधिक प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याबाबत उत्तराखंड पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता. त्यासंदर्भात हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामधील बोगस करोना चाचणी घोटाळ्याच्या चौकशीसाठी हे छापे टाकले आहेत, असे ईडीनं सांगितलं आहे.
आतापर्यंत झालेल्या तपासातून वरील सर्व लॅबना कुंभ मेळा २०२१ च्या पार्श्वभूमीर उत्तराखंड सरकारकडून कोरोनाच्या रॅपिड अँटिजेन चाचणी व आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे कंत्राट दिलं होतं.
कदाचितच कोविडच्या चाचण्या केल्या असतील व तपासासाठी बनावट एन्ट्री केल्या. तसेच आर्थिक लाभ मिळवण्यासाठी बनावट बिलं देखील तयार केली आहेत, असे समोर आलं आहे.
याबाबत ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, लॅबना उत्तराखंड सरकारनं ३.४ कोटी रूपयांची रक्कम आंशिक रक्कम म्हणून याअगोदर दिली होती.
तसेच या प्रयोगशाळांमध्ये वापरली जाणारी कार्यप्रणाली अशी होती की त्यांनी कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढलेली दाखवण्यासाठी एकच मोबाईल क्रमांक किंवा बनावट मोबाईल क्रमांक, एकच पत्ता अथवा एकच रेफरल फॉर्मचा वापर केला जात होता.
या लॅब्सच्या बनावट नकारात्मक चाचण्यांमुळे त्यावेळी हरिद्वारमध्ये संसर्गाचा दर खऱ्या अर्थाने ५.३ टक्क्यांच्या तुलनेत ०.१८ टक्के इतका होता, असेही ईडीनं नमूद केलं आहे.