TOD Marathi

औरंगाबाद: राज्यात पुन्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन होईल, या चर्चेला पुन्हा एकदा सुरूवात झाली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या इमारतीच्या भूमीपूजन समारंभात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचा उल्लेख करतांना त्यांनी रावसाहेब दानवे यांना उद्देशून ‘आमचे माजी आणि झाले तर भावी सहकारी’ असं वक्तव्य केलं आणि युतीच्या चर्चेला सुरुवात झाली.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून या सरकारच्या भविष्याबाबत कायमच शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यात भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही पुढील तिन दिवसातच नवीन बातमी देण्याचे संकेत दिले होते. मी खुप काळ माजी मंत्री राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या आजच्या वक्तव्यामुळे ही चर्चा पुन्हा युतीकडे वळाली आहे. आता नेमकं हे वक्तव्य कुठल्या अर्थाने आणि कोणाला उद्देशून होतं, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचे कालपासून अर्थ अन्वयार्थ लावले जात होते. शिवसेना-भाजप एकत्र येणार असल्याच्या चर्चाही होत होत्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर आज औरंगाबाद दौऱ्यात मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी मिश्किल उत्तर दिलं.