TOD Marathi

पुणे: औरंगाबाद येथे भाषणात बोलत असताना, व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी, हे वाक्य म्हणताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागे बसलेल्या केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे पाहिलं. यामुळे आता राजकीय वर्तुळात युतीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवारांना मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी काय बोलावं आणि काय बोलू नये, हे मी कसं ठरवणार, असा सवाल पत्राकरांनाच विचारला. पुढे बोलताना ते म्हणाले मुख्यमंत्र्यांच्या मनात काय आहे, हे मी कस सांगू शकतो ? माझ्याशी बोलताना तर सरकारचे निर्णय, काय करायचं, राज्य कसं चालवायचं, समस्या काय, याच्याच चर्चा होतात, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.

ठाकरे यांनी केलेल्या त्या वक्तव्याने भविष्यात पुन्हा एकदा सेना-भाजप युती होणार का, अशी चर्चा सध्या रंगली आहे. त्यातच चंद्रकांत पाटील यांनी देखील असे काही वक्तव्य केले होते ज्यामुळे युतीची चर्चा आधीच रंगत होती त्यात आता मुख्यमंत्र्यांच्या व्यक्तव्याची भर पडली आहे. यावरून आता राजकीय क्षेत्रातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.