TOD Marathi

नवी दिल्ली: मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीने आजपासून पुढील तीन आठवडे म्हणजे ७ ऑक्टोबरपर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्यासह अन्य मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त विविध राज्यांमध्ये लसीकरण मोहीम, कोविड योद्ध्यांचा सन्मान असे अनेक कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आले आहेत.

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचं निमित्त साधून अनेक नवीन उपक्रमांना सुरुवात करण्यात येत आहे, मोदींचा वाढदिवस भाजप कार्यकर्त्यांकडून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र या वेळेस आता काँग्रेस देखील त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. यूथ काँग्रेस हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून देशभरात साजरा करणार असल्याचे समोर आले आहे. मोदींच्या कार्यकाळात महागाई आणि बेरोजगारी दोन्ही वाढत असल्याने काँग्रेसराष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून साजरा करणार आहे.

दरवर्षी २ कोटी रोजगार देऊ असं आश्वासन नरेंद्र मोदींनी सत्तेत येण्यापूर्वी दिलं होतं, याचीच आठवण युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांनी करून दिली. ते म्हणाले की, रोजगाराचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले मोदी आज रोजगाराबद्दलच गप्प आहेत. देशातील बेरोगजारीचा दर २.४ टक्क्यांवरून १०.३ टक्क्यांवर पोहोचला आहे. तरुणांना रोजगार देण्यात सरकार असमर्थ ठरलंय, अशी टीका श्रीनिवास यांनी केली.