TOD Marathi

मुंबई: एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu) आज मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात चर्चा मात्र झाली ती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawade) यांची. द्रौपदी मुर्मु यांच्यासोबत मुंबईत भाजपाच्या बड्या नेत्यांसोबत वावरत असलेल्या तावडेंचा आत्मविश्वास परतल्यासारखा वाटत होता. खासदारांच्या मागणीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रपतीपदासाठी मुर्मु यांच्या नावाला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर गुरुवारी मुंबई दौऱ्यात द्रौपदी मुर्मु या मातोश्रीवर जाणार का, अशा चर्चा राजकीय वर्तुळात होत्या. या दरम्यान मातोश्रीशी विनोद तावडे हे संपर्कात असून, द्रौपदी मुर्मु यांचा मातोश्री दौरा व्हावा, यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे वृत्त होते. अनेक दिवसांनी यानिमित्ताने विनोद तावडे यांची राजकीय चर्चा झाली. राज्याच्या बदलत्या राजकारणात विनोद तावडे यांचे महत्त्वही वाढत असल्याचे यानिमित्ताने समोर आले.
उद्धव ठाकरेंसोबत चांगले संबंध
एकनाथ शिंदे यांचे बंड, त्यानंतर झालेला शपथविधी, यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काहीसे एकाकी पडले आहेत. अशात भाजपाकडूनही त्यांना चुचकारण्याचा प्रयत्न करण्यात येतो आहे. त्यासाठीच विनोद तावडे हे मूर्मु यांच्या मातोश्री भेटीसाठी शिवसेना नेतृत्वाच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येते आहे. उद्धव ठाकरे आणि विनोद तावडे यांचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे ठाकरे आणि भाजपा यांच्यात चांगले संबंध निर्माण करण्याची जबाबदारी तावडेंवर सोपवण्यात आल्याचीही चर्चा आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली दौऱ्यातही घेतली होती भेट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यातही विनोद तावडे दिसले होते. भाजपामधील बदलत्या राजकारणाचे हे संकेत त्यानिमित्ताने समोर आले होते.

विधानसभेला तिकिट नाकारले नंतर संघटनात्मक जबाबदारी
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारमध्ये शिक्षण मंत्रालय विनोद तावडेंकडे सोपवण्यात आले होते. (Vinod Tawde was Education Minister) मात्र नंतरच्या काळात त्यांचे मंत्रिपद काढून घेण्यात आले होते आणि शिक्षणमंत्रीपद आशिष शेलार यांच्याकडे देण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारीही नाकारण्यात आली. त्यानंतर वर्षभरापूर्वी विनोद तावडे यांना राष्ट्रीय चिटणीसपदी नेमण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याकडे राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रमोद महाजनांनतर पहिल्यांदाच अशी जबाबदारी भाजपात एका मराठी नेत्यावर सोपवण्यात आलीय. आता राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मु यांच्या मुंबई दौऱ्याची जबाबदारी विनोद तावडेंवर सोपवण्यात आली होती. यानिमित्ताने राज्याच्या राजकारणात विनोद तावडेंचे महत्त्व पुन्हा वाढल्याचे चित्र दिसते आहे.