TOD Marathi

पुणे:
तिथे सुंदर रांगोळ्या काढल्या होत्या, दिव्यांची आकर्षक आरास केली होती, ठिकठिकाणी आकाश कंदील लावण्यात आले होते, दिवाळीची सुरेल गाणी विद्यार्थीनी गात होत्या. प्रेक्षक अगदी तल्लीन होऊन ऐकत होते. विद्यार्थी दौलतच्या बहारदार शेरो-शायरीच्या कार्यक्रमाने तिथल्या दिवाळसणाच्या कार्यक्रमाला मोठी रंगत आली होती. हे दृश्य होतं नॅशनल असोसिएशन फॉर दे वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड्’ (NAWPC) संस्थेच्या प्रांगणातलं आणि सादर करत होती या संस्थेतील सर्व नेत्रहीन मूलं. (Diwali Celebration in NAWPC Organization Pune)

NAWPC संस्थेतील नेत्रहीन व दिव्यांग मुलं, मुली जीवनातील दुःख, व्यथा, चिंता विसरून फटाके वाजवण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. NAWPC संस्थेकडून दिवाळसणानिमित्त या मुला, मुलींना नविन कपडे, भेटवस्तू, मिठाई मिळाल्यामुळे तर या मुला-मुलींचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. हा दिवाळसण संस्थेत मोठ्या दिमाखात साजरा झाला. उमेश चौधरी यांच्या सहकार्यामुळे दुर्लक्षीत राहिलेल्या नेत्रहीन मुला, मुलींना दिवाळसणाचा मनमुराद आनंद घेता आला.

शेतकरी, मजूर अशा खेड्यापाड्यातल्या पालकांच्या या नेत्रहीन व दिव्यांग मुलांची दिवाळी देखिल मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडली. हि दिवाळी NAWPC संस्थेत विद्यार्थ्यांबरोबर साजरी करता यावी म्हणून लिज्जत पापडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश कोते, ज्येष्ठ साहित्यिक मिलिंद जोशी आवर्जून उपस्थित होते. (CEO of Lijjat Papad Mr Suresh Kote)

सुरेश कोते आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की “राहुलजींच्या हाताखाली शिकलेले विद्यार्थी आज मोठ मोठ्या पदावर काम करत आहेत हे पाहून मला खूप आनंद वाटला. राहुल व देवता देशमुख हे आई-वडीलांप्रमाणेच या नेत्रहीन मुलांचा सांभाळ करतात. या मुलांच्या कल्याणासाठी ते निस्वार्थ भावनेनं झटत आहेत. हे दोघे या मुलांसाठी खरतर देवदुतच आहेत. नेत्रहीन मुलींची दिवाळीची गाणी, नेत्रहीन मुलांचा शायरीचा कार्यक्रम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो. हा आगळा-वेगळा दिवाळीचा कार्यक्रम माझ्या आयुष्यात नेहमीच स्मरणात राहिल. इथून पुढच्या प्रत्येक दिवाळीला मी मीठाई घेऊन आपल्या सोबत दिवाळी साजरी करण्यासाठी येईन.” अशी ग्वाही देखिल त्यांनी या प्रसंगी बोलताना दिली.

मिलिंद जोशी (Milind Joshi) म्हणाले की, “या संस्थेतील नेत्रहीन विद्यार्थीनीने दिवाळीची जी गाणी सादर केली ती ऐकताना माझं मन अक्षरशः भरुन आलं. इथल्या मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर कलागुण आहेत. त्यांचं विकसन आणि संवर्धन त्यांनी असच करत रहावं. तुमच्या सगळ्यांकडे आतलं आणि बाहेरचं पाहण्याची दृष्टी आहे. त्यामुळे संकटांना घाबरू नका. तुमच्या मनात यशाचे, प्रगतीचे, आनंदाचे दीप सतत तेवत राहोत.” अशा अनोख्या शब्दात त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

“बाहेरच्या जगात जे चित्र दुर्मिळ होत चाललं आहे ते चित्र मी या NAWPC संस्थेत पाहिलं. इथल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या चेह-यावरील ओसंडून वाहणारा निखळ आनंद मी इथे पाहिला. एकमेकांशी अतुट नातं आणि खरं प्रेम मी त्यांच्यात पाहिलं. हे सगळच माझ्यासाठी खूप उभारी देणारं आहे. आज मी आपल्या सोबत दिवाळी साजरी केली, मी या परिवाराची सदस्य झाले आहे. पुढच्या प्रत्येक दिवाळीला मी संस्थेत येत जाईन.”असं म्हणत समाज सेविका पुष्पा जैन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“आपण चांगलं शिक्षण घ्या, मोठं कर्तृत्व करा, ज्ञानाचे दीप लावा ज्यामुळे तुमचं सर्वाचं आयुष्य प्रकाशमान होईलच, भवितव्य उज्वल होईलच. पण त्याचबरोबर समाज देखिल तुमच्यापासून प्रेरणा घेऊ शकेल.” असं आवाहन आणि शुभेच्छा संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख यांनी व्यक्त केल्या. (Founder President of NAWPC Rahul Deshmukh)

या समारंभाला उमेश चौधरी, ओमप्रकाश जाट, भाग्यश्री साळुंखे, पुष्पा जैन उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राहुल देशमुख, सुत्रसंचालन संस्थेच्या विश्वस्त देवता अंदुरे-देशमुख यांनी केले. (Devata Andure-Deshmukh) तसेच या समारंभाला संस्थेचे नेत्रहीन व कर्णबधिर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.