TOD Marathi

महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात गेल्या काही दिवसांपासून नवनव्या घडामोडी होत आहेत. आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकीय सत्तानाट्यात नवा ट्विस्ट येणार आहे. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला जाणार आहेत. देवेंद्र फडणवीस आज दुपारी दोनच्या सुमारास दादर येथील राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीला जाणार आहेत. (Devendra Fadnavis will be meeting MNS chief Raj Thakceray)

गेल्या काही काळापासून मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढत असल्याचे पाहायला मिळाले. नुकत्याच झालेल्या राज्यसभा, विधानपरिषद तसेच विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळीही मनसेच्या आमदाराने भाजपला साथ दिली होती. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज ठाकरे यांचे जाहीर आभार देखील मानले होते. तसेच आपण लवकर त्यांची भेट घेऊन आभार मानू, असेही म्हटले होते. त्यानुसार आज देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. आता या भेटीत काय होतं, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यातील सत्तांतरापूर्वी मनसे आणि भाजपमधील जवळीक वाढली होती. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर राज ठाकरे यांच्याशी फोनवरुन संवाद साधला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसे हे नेहमीच परस्परांचे कट्टर विरोधक राहिले आहेत. मात्र, आता शिवसेना खिळखिळी झाल्यानंतर आगामी निवडणुकांमध्ये मनसे याचा फायदा घेऊन आपला विस्तार करणार का, हे पाहावे लागेल.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांना शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणार का अशाही चर्चा आहेत, यापूर्वीच रामदास आठवले यांनी या गोष्टीला विरोधही केला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीत काय होतं याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.