TOD Marathi

नवी दिल्ली: उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेतील बंडखोरांपैकी तुरळक अपवाद वगळता इतर जण निवडून येणार नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी आता प्रत्युत्तर दिले आहे. आजपर्यंत राज्यात शिवसेना जेव्हा जेव्हा फुटली आहे, त्या प्रत्येक फुटीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचा हात होता, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा शरद पवार यांनी शिवसेना का फोडली? बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) जिवंत असताना त्यांना यातना का दिल्या, याचं उत्तर शरद पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावं, असेही दीपक केसरकर यांनी म्हटले. ते बुधवारी दिल्लीत बोलत होते.

याचवेळी दीपक केसरकर यांनी शिवसेना व राष्ट्रवादीने आगामी निवडणुका एकत्र लढवाव्यात, असा आग्रह धरला म्हणून शरद पवार यांचा समाचार घेतला. शिवसेनेतील उद्धव ठाकरे गटाने राज्यपालांना शिंदे-फडणवीस सरकार बेकायदा असल्याचं पत्र दिलं आहे. यामध्ये मंत्र्यांना शपथ दिली जाऊ नये, असेही म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना चुकीच्या नेत्यांकडून मार्गदर्शन होत आहे, त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले असावे, असेही दीपक केसरकर म्हणाले. (Uddhav Thackeray is being misguided, says Deepak Kesarkar)

शिवसेनेतील फुटीचे दाखले देत असताना छगन भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे अशा नेत्यांना शरद पवारांची मदत होती कारण शरद पवार राज्यातील ज्येष्ठ नेते आहेत असं वक्तव्य केसरकर यांनी केलं, त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यावर काय प्रतिक्रिया दिली जाते हे बघावं लागणार आहे.

काय म्हणाले होते शरद पवार?

शिवसेनेचे आमदार जरी पक्ष सोडून गेले असले तरी शिवसैनिक तिथेच आहेत, त्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये एक-दोन अपवाद सोडले तर या ४० आमदारांपैकी एकही जण निवडून येणार नाही, असे शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठकीत म्हटले होते.