TOD Marathi

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जलआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद शहराचा पाणीप्रश्न गेल्या दोन वर्षांपासून गंभीर बनला आहे. महापालिकेला नियोजन न जमल्याने औरंगाबादकरांना आठ दिवसांआड पाणी मिळत आहे. महापालिका पाणीप्रश्न हाताळण्यास सपशेल अपयशी ठरली आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारने औरंगाबादकडे दुर्लक्ष केले आहे. या दोन्ही यंत्रणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी भाजप आज महापालिकेवर जलआक्रोश मोर्चा काढणार आहे. य मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतील,” अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

मंत्री भागवत कराड पुढे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात आमदार अतुल सावे यांच्या पुढाकाराने औरंगाबादसाठी पाणीपुरवठा योजना मंजूर केली. महापालिकेचा हिस्साही सरकारने भरला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर योजनेच्या नियम, अटींमध्ये बदल केला. नवीन योजनेचे भूमिपूजन केले. दीड वर्षे उलटून गेले तरी १० टक्क्याच्या वर काम झालेले नाही. असाच वेग राहिला तर औरंगाबादला आणखी दहा वर्षे पाणी मिळणार नाही.’

‘जनसामान्यांचा जल आक्रोश महापालिका आणि राज्य सरकारपर्यंत पोचावा यासाठी रविवारी दुपारी चार वाजता पैठणगेट येथून मोर्चा काढण्यात येईल. टिळकपथ, औरंगपुरा, खडकेश्वर मार्गे महापालिकेवर जाईल आणि तिथे सभेत रूपांतर होईल,’ असेही कराड यांनी सांगितले.

या आंदोलनाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, भागवत कराड यांच्यासह प्रमुख नेते, स्थानिक भाजपचे पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. महिला पदाधिकारी हंड्यात दूषित पाणी घेऊन येणार असल्याची माहिती आहे.