TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – केंद्र सरकारने ऑक्‍सिजन टॅंक, कोविडची औषधे आणि वैद्यकीय उपकरणांवरील टॅक्स त्वरीत काढावेत, अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या तथा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केलीय. याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

अनेक स्वयंसेवी संस्था, देणगीदाते आणि दानशूर कंपन्यांनी भारताला अधिक प्रमाणात कोविडच्या अनुषंगाने मदत देणे सुरू केलंय. त्यावरील कस्टम ड्युटी आणि जीएसटी केंद्र सरकारने त्वरित काढावी, असा निर्णय घेतला गेला तर राज्यांनाही मोठी मदत होणार आहे. कारण, या वस्तूंची प्रत्यक्ष मागणी आणि पुरवठ्यामध्ये सध्या बरीच तफावत आहे. त्याची पुर्तता करताना राज्य सरकारांना खूप कष्ट पडत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी नरेंद्र मोदींना पाठवलेले हे तिसरे पत्र आहे.

औषधे, कोविडच्या वापरासाठीची उपकरणे यांच्यावर अनेक प्रकारचे टॅक्स सध्या लागू आहेत, ते काढून टाकावेत. तरच परिस्थिती सुरळीत होण्यास मदत होईल. जीएसटी आणि कस्टम ड्युटी काढून टाकण्याचा अधिकार केंद्राकडे आहे. त्यांनी त्यानुसार उपाययोजना केली तर विदेशातून येणारी मदतही त्यात वाढू शकले, असेही तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्या तथा प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

करोना लसच्या संबंधातही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी सरकारला धारेवर धरले आहे. या वाटपातील गोंधळाबद्दलही मोदींना जबाबदार धरले असून देशातील सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देणे ही केंद्राचीच जबाबदारी आहे, असेही त्यांनी नमूद केलंय. त्यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.