TOD Marathi

नवी दिल्ली: मोठया प्रतीक्षेनंतर देशात 5-जी सेवा (5-G service) सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर 5-जी सेवेचा प्रारंभ इंडियन मोबाईल काँग्रेसमध्ये करणार आहेत. पहिल्या टप्प्यात देशातील तेरा शहरांमध्ये ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इंडिया मोबाईल काँग्रेस कार्यक्रम दिल्लीतील प्रगती मैदानावर सुरू होत आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी (Narendra Modi) हाय-स्पीड मोबाईल इंटरनेट सुविधेच्या लाँचिंगदरम्यान 5-जी सेवांच्या कार्याचे प्रात्यक्षिकदेखील पाहणार आहेत.

रिलायन्स जिओ (Reliance – Jio) आणि एअरटेलने देशात प्रथम हाय-स्पीड 5-जी इंटरनेट देण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. 2023 मध्ये देशातील 10 कोटींहून अधिक लोकांना 5-जी सेवा वापरायची आहे. या लोकांकडे 5-जी नेटवर्कसाठी आवश्यक स्मार्टफोनही आहेत. दरम्यान, 70 हजारांहून अधिक लोक इंडियन मोबाईल काँग्रेसला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच कार्यक्रमात देशातील सर्वात मोठे तंत्रज्ञान प्रदर्शनही भरवले जाणार आहे.

कोणत्या शहरांत सर्वप्रथम 5-जी सेवा?

5-जी सेवा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात एकूण 13 शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता या मेट्रो शहरांचा समावेश आहे. त्यानंतर दोन वर्षांत 5-जी कनेक्टिव्हिटी देशभरात वेगाने विस्तारली जाईल. पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, मुंबई, पुणे, बंगळूर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता आणि लखनौ या 13 मोठ्या शहरांमध्ये 5-जी सेवा सुरू केली जाणार आहे.