TOD Marathi

जसे ते दहा-बारा साखर कारखाने सांभाळतात तसं मी पाच-सहा जिल्हे आरामात सांभाळू शकतो अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली. नुकतेच अजित पवार (Ajit Pawar) यांनी बोलताना म्हटलं होतं की एक जिल्हा सांभाळणं म्हणजे मोठी कसरत असते. तर सहा सहा जिल्हे एका एका व्यक्तीला देऊन काम कसे चालेल. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील पालकमंत्री हे स्पायडरमॅन सारखे काम करणार का? अशी खोचक टीका पालकमंत्री वाटपानंतर केली होती.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रत्यूत्तर दिले. ते नागपुरात पत्रकारांशी बोलत होते. अजित पवार यांच्या बद्दलचा प्रश्न विचारला असता जसं ते दहा-बारा साखर कारखाने सांभाळू शकतात तसं मी पाच-सहा जिल्ह्यांचं काम आरामात सांभाळू शकतो, असं त्यांनी म्हटलं. त्यासोबतच येत्या आठवडाभरात सर्व जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका होतील, असे देखील त्यांनी म्हटलं. त्यानंतर ते गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर रवाना झाले.

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये नुकतेच पालकमंत्री वाटप झाले. यामध्ये काही पालकमंत्र्यांना एकापेक्षा अधिक जिल्ह्याचा कारभार देण्यात आला. त्यातच सर्वाधिक म्हणजे सहा जिल्हे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देण्यात आले आहेत. त्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा महाराष्ट्र सांभाळला आहे, त्यामुळे ते सहा जिल्हेही चांगले सांभाळतील. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांच्या होत्या. तर याच्या विरोधी प्रतिक्रिया ह्या विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या होत्या.