TOD Marathi

Taliban कडून अफगाणिस्तानात कर्जमाफीचा निर्णय ; महिलांना Government मध्ये सामील करून घेणार

टिओडी मराठी, काबूल, दि. 17 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर देशभर कर्जमाफी जाहीर करून टाकलीय. तसेच देशातील महिलांना सरकारमध्ये सामील होण्याचे आवाहन केलं आहे.

देशामध्ये निर्माण झालेला तणाव शांत करण्याचा हा प्रयत्न सुरु आहे. तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य असलेल्या इनामुल्लाह समानगनी याने ही माहिती दिली आहे. देशातील प्रांतीय पातळीवरील प्रशासनाच्या बाबतीत तालिबानकडून केलेले हे पहिले वक्तव्य आहे.

तालिबानने देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर काल दिवसभर काबुल शहरामध्ये जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत राहिल्यात. तालिबानने तुरुंग खुले करून कैद्यांना सोडून दिले असून शस्त्रगारही लुटले आहेत. पूर्वीच्या तालिबानी राजवटीत क्रौर्याची परिसीमा झाली होती, याची आठवण यामुळे काबुलच्या रहिवाशांना झाली आहे.

यावेळी मात्र महिलांप्रती तालिबानची भूमिका सौम्य झाली असून आता महिलांना सरकारमध्ये सहभागी करून घेणार आहे, असे समानगनी याने सांगितले आहे. अफगाणिस्तानचे नवे तालिबान सरकारचे स्वरुप नक्की कसे असेल? हे अद्याप निश्‍चित झालेले नाही. मात्र, सरकारमध्ये पूर्ण इस्लामी नेते असणार आहेत.

तसेच सरकारमध्ये सर्व गटांनी सहभागी व्हावे. आमचे लोक मुसलमान असून आम्ही त्यांना इस्लामची सक्ती करायला इथे आलो नाही, असेही त्याने सांगितले. मात्र, सरकारचा तपशील त्याने जाहीर केलेला नाही.