टिओडी मराठी, नाशिक, दि. 10 जून 2021 – नाशिकमधील एका 71 वर्षीय वयोवृद्धाच्या शरीराला लोखंडी व स्टीलच्या वस्तू चिकटत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, कोविशील्ड ही कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर हा प्रकार होत आहे, असा दावा अरविंद सोनार यांनी केला आहे. मात्र, हा दावा तज्ज्ञांनी फेटाळला आहे, असे वृत्त देखील एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
जुन्या सिडको परिसरामध्ये राहणारे अरविंद सोनार यांनी कोविशील्ड लसीचा पहिला डोस 9 मार्चला घेतला. त्यानंतर 2 जून रोजी कोविशील्ड लसीचा दुसरा डोस एका खासगी रुग्णालयात घेतला.
लसचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यावर कोणताही त्रास झाला नाही, असे अरविंद सोनार यांनी सांगितलंय. त्यानंतर 9 जून रोजी त्यांच्या मुलाने इंटरनेटवर लस घेतल्यानंतर एका व्यक्तीच्या शरीरावर लोखंडी वस्तू चिकटत आहेत, असा एक प्रकार बघितला.
यावेळी वडिलांमध्ये चुंबकत्व संचारत आहे, असं त्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर त्याने वडिलांवर तो प्रयोग केला. सुरुवातीला लोखंडाचा पत्रा लावून बघितला, तो चिकटला. नंतर नाणी लावली, त्यानंतर स्टीलच्या वस्तू लावल्या व त्या चिकटल्या, असे अरविंद सोनार यांनी सांगितलंय.
परंतु खासगी डॉक्टरांशी त्यांनी संपर्क साधला असता याबाबत सांगता येणार नाही असं त्यांना उत्तर मिळालंय.
सोनार यांच्यावर दहा वर्षांपूर्वी बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे. त्यांना मधुमेहाचाही आजार असून हा सर्व प्रकार कशामुळे झाला असावा ही जाणून घ्यायची सोनार यांची इच्छा आहे. माझी तपासणी करुन घ्यावी, अशी मागणी त्यांनी केलीय. परंतु हा अजब प्रकार सोशल मीडियामध्ये हा चर्चेचा विषय ठरत आहे.
डॉ. तात्याराव लहाने यांनी फेटाळला तो दावा :
लसचा आणि शरीराला स्टीलचा वस्तू चिकटण्याचा संबंध नाही, अशी प्रतिक्रिया राज्याच्या कोवड-19 कृती दलाचे सदस्य डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, “आपण अनेकांना कोविशील्ड लसचे डोस दिलेत. त्यांच्या शरीराला स्टील चिकटत असलं तरी त्याचा व लसीचा कोणताही संबंध नाही.
या शिवाय या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक आधार नाही. त्यांच्या शरीराला स्टील तसेच लोखंड चिकटतं. त्याच्या त्वचेला काहीतरी असावं, नाशिकमध्ये त्यांची तपासणी करायला हवीय. परंतु याचा आणि लसीचा संबंध लावणं योग्य नाही. कारण, लसीमुळे असं काही घडत नाही.
(टीप : अरविंद सोनार यांचा हा वैयक्तिक दावा आहे. त्या दाव्याशी ‘ती’ वृत्तवाहिनी सहमत नाही. तसेच ‘टिओडी मराठी’ देखील याबाबत सहमत नाही. हे संकलित वृत्त असून केवळ माहिती म्हणून वाचकांसाठी दिले आहे. याबाबत ‘टिओडी मराठी’चा दुसरा कोणताही हेतू नाही. )