TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 3 जून 2021 – महाराष्ट्रातील कोरोनाचे निर्बंध कायम आहेत. राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेली अनलॉकची घोषणा फेटाळली आहे. कोरोनाचा संसर्ग अजूनही नियंत्रणात नाही. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ‘ब्रेक दि चेन’मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. मग, विजय वडेट्टीवारांनी अनलॉकची घोषणा परस्पर घोषणा करून टाकली का?, त्यांनी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली नव्हती का?, सरकारमध्ये ‘अनलॉक’बाबत एकमत नाही का?, ही घोषणा नेमकी कधी आणि कुणी करायची आहे?, की हा श्रेयवादाचा विषय आहे?, अशी चर्चा या निमित्ताने होत आहे.

याबाबत आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत आहेत. यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट व ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरवित आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसूचित करणार आहेत.

अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार करण्यात येणार आहे. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेतली जाईल. त्यानंतर अधिकृत निर्णय कळविला जाईल, असे शासन निर्णयान्वये स्पष्ट केले जाईल.

काही तासांपूर्वी हे घडलं :
लॉकडाऊनबाबत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला होता. राज्यात ज्या ठिकाणी कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांपेक्षा कमी आहे, त्याठिकाणी पूर्णपणे अनलॉक केलं जाणार आहे, अशी घोषणा राज्याचे मदत व पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केली होती.

परंतु तासभरात राज्यातील निर्बंध उठवले नाहीत आणि साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता यावरून निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना शासन निर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील, असे अवघ्या काही मिनिटांत शासनाद्वारे सांगितले आहे.

विजय वडेट्टीवार यांनी केलेली ती घोषणा शासनाकडून फेटाळल्यानंतर काही मिनिटांनी पुन्हा ते माध्यमांसमोर आले. राज्य सरकारमध्ये कुठलिही गफलत नाही. अनलॉकच्या ५ लेव्हलला तत्त्वत: मान्यता दिली आहे. मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असे म्हणत वडेट्टीवार ‘यु’ टर्न घेतला.