TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – जगातील प्रसिद्ध संशोधन पत्रिका ‘द लॅन्सेट’ने कोरोना परिस्थितीत हाताळण्यामध्ये नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरलं आहे, असे सांगत मोदी सरकारच्या कारभारावर कडवी टीका केली आहे. यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम आक्रमक झाले आहेत. थोडी जरी लाज शिल्लक असेल तर या केंद्र सरकारने देशाची जाहीर माफी मागावी आणि केंद्रातील आरोग्य मंत्री राजीनामा द्यावा, अशी मागणी पी. चिदंबरम यांनी केली आहे. ट्विट करून पी. चिदंबरम यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोना महामारीशी लढण्याचं काम एका मजबूत टीमवर आणि पंतप्रधानांवर सोडून द्यावं. आरोग्य मंत्री आणि डॉक्टर, सल्लागारांच्या टीमला त्यात स्थान देऊ नये, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिलाय.

त्या द लॅन्सेटने काय लिहिलं?
भारतामध्ये 4 मे रोजी 2 कोटीपेक्षा अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. दररोज भारतात साधारणतः 3 लाख 78 हजार नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. याशिवाय आतापर्यंत कोरोनामुळे 2 लाख 22 हजार कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून यात वाढ होण्याचा धोका आहे. रुग्णालयं रुग्णांनी भरली आहेत आणि वैद्यकीय कर्मचारी थकले आहेत. तसेच त्यातील अनेकांना कोरोना संसर्ग झाला आहे, असं लॅन्सेटच्या अग्रलेखात म्हटलंय.

सोशल मीडियावर नागरिकांसह डॉक्टरही ऑक्सिजन, बेड व इतर वैद्यकीय सुविधांसाठी मदत मागत आहेत. दुसरीकडे कोरोनाची दुसरी लाट मार्च महिन्यामध्ये येण्याआधी आरोग्यमंत्री हर्षवर्धन भारताने कोरोनाला हरवलं आहे, अशी घोषणा करत होते. विशेष म्हणजे, जागतिक पातळीवर वारंवार दुसऱ्या कोरोना लाटेविषयी आणि कोरोनाच्या नव्या विषाणूंबाबत इशारा दिला होता, असं नमूद केलं आहे.

नरेंद्र मोदी सरकारवर काँग्रेसची टीका सुरू
चिदंबरम यांच्याअगोदर काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीही मोदींवर टीका केलीय. देशातील यंत्रणा नव्हे तर, सरकार कोरोना रोखण्यात अपयशी ठरलं आहे, असे काँग्रेसने म्हटलं आहे.

जाणून घ्या, कोण काय म्हणालं?
सोनिया गांधी म्हणाल्या, संकट रोखताना सिस्टिम फेल झालेली नसून नरेंद्र मोदी सरकार फेल झालं आहे. नरेंद्र मोदी निवडणुकीमध्ये मश्गूल राहिले. कोरोना संकटाबाबत दिलेल्या इशाऱ्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. कोरोना संकट रोखण्यासाठी तातडीची सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी होती.

कोरोनाची दुसरी लाट येणार असल्याचे इशारे दिलेले असतानाही आरोग्य व्यवस्था मजबूत केली नाही. ऑक्सिजन, औषधे आणि व्हेंटिलेटर आदी व्यवस्था उभारल्या नाहीत. नागरिकांना दिलासा देण्याऐवजी भाजपशासित राज्यातील सरकार हुकूमशहासारखे वागले. सोशल मीडिया व इतर प्लॅटफॉर्मवर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, देशाला पीएम आवास नव्हे, श्वास हवा आहे. जनतेचा जीव जात आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टॅक्स वसुली काही थांबलेली नाही.