TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 9 मे 2021 – मागील वर्षी आणि यंदाही कोरोनामुळे जो भारत देशात हाहाकार झाला आहे, याला नरेंद्र मोदी सरकार जबाबदार आहे, अशी कडवी टीका मेडीकल जर्नल लॅन्सेटमध्ये केली आहे.

मेडीकल जर्नल लॅन्सेटमध्ये भारतातील कोरोना परिस्थितीवरुन मोदी सरकारवर कठोर टीका केली आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यापेक्षा ट्विटरवरील टीकेचे ट्विट्स काढून टाकण्यावर मोदी सरकारने अधिक भर दिला आहे. भारत देशात कोरोना संसर्गाचा मोठा स्फोट झालाय. या पार्श्वभूमीवर ‘द लॅन्सेट’ने संपादकीयमधून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आणण्यापेक्षा टीकाकारांची तोंडं दाबण्यास नरेंद्र मोदींनी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे. कोरोना संकटादरम्यान त्यांच्यावर आणि त्यांच्या सरकारवर टीका करणाऱ्यांची मुस्कटदाबी करण्याचा सरकारचा प्रयत्न हा माफ करण्यासारखा नाही, असेही लॅन्सेटनं म्हटलंय.

तसेच पुढे या संपादकीयामध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युएशन’ या संस्थेनं दिलेल्या इशाऱ्याचा हवाला दिला आहे. त्यात म्हटलंय की, येत्या 1 ऑगस्टपर्यंत भारतात दहा लाख लोकांचा मृत्यू कोरोनामुळे होईल, असा अंदाजहि बांधला आहे. जर असं घडलं तर या स्वनिर्मित ‘या’ हाहाकारासाठी केवळ आणि केवळ मोदी सरकारच जबाबदार असेल, असं हि म्हंटलं आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावाबद्दल अगोदर पूर्वसूचना देऊन देखील सरकारने अनेक धार्मिक कारणासाठी देशभरातून जमून गर्दी करण्यास परवानगी दिली. यासोबत निवडणुकीसाठी मोठ्या सभादेखील भरवण्यास परवानगी दिली. कोरोना काळात केली जाणारी टीका आणि मोकळ्या चर्चेत आडकाठी आणण्याची मोदी सरकारची ही वृत्ती अक्षम्य आहे, अशीहि टीका लॅन्सेटने केली आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायांचा प्रचंड अभाव देशामध्ये आहे. केवळ रुग्णसंख्या कमी झाली म्हणून कोरोनावर विजय मिळविल्याच्या फुशारक्या मारल्या जात आहे, यास केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसहित सरकारने सुरूवात केली. हे सगळं कोरोनाच्या नव्या स्ट्रेनसह देशामध्ये दुसरी लाट येण्याचा इशारा दिला जात असताना सरकारने केलंय, अशी टीका या संपादकीयात केली आहे.