TOD Marathi

टिओडी मराठी, अमरावती, दि. 22 जून 2021 – अमरावती मतदारसंघाच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलीय. त्यामुळे नवनीत रवी राणा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. यामुळे नवनीत राणा यांच्या खासदारकी तुर्तास टळली आहे.

मुंबई हायकोर्टाने नवनीत राणा यांचं जात वैधता प्रमाणपत्र फेटाळून लावून २ लाखांचा दंड ठोठावला होता. त्यासह ६ आठवड्यात जातीचा दाखला आणि जात वैधता प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेश दिले होते. नवनीत रवी राणा यांनी फसवणूक करून आणि बनावट कागदपत्रे सादर करून जात प्रमाणपत्र मिळवले आहे, असा ठपका न्यायालयाने ठेवला होता.

मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात नवनीत राणा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली. त्यावरील सुनावणीमध्ये कोर्टाने आज हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलीय. त्यासंबंधिचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिलंय.

२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राणा उमेदवार होत्या. २०१९ मध्ये शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांचा पराभव करून त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. अडसूळ यांनी राणा यांच्या निवडणुकीला रिट याचिकेद्वारे २०१८ मध्ये आव्हान दिले होते.

राणा यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे ‘मोची’ असल्याचे दाखवून मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांकडून अनुसूचित जातीचा दाखला मिळवला आहे. आणि मुंबई उपनगर जिल्हा जात प्रमाणपत्र वैधता समितीने ३ नोव्हेंबर २०१७ रोजी ते प्रमाणपत्र वैध ठरवले, असा अडसूळ यांचा आरोप होता. खंडपीठाने या याचिकेवरील निकाल ९ एप्रिल २०२१ रोजी राखून ठेवला होता.