TOD Marathi

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता राज्यात राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला, त्यानंतर त्यांनी वर्षा हे निवासस्थान सोडलं आणि थेट मातोश्री निवासस्थान गाठलं. त्यामुळे उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे. त्यातच आता मुख्यमंत्री हे मंत्रालयातील सर्व सचिवांसोबतही संवाद साधणार आहेत. सचिव आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत ते आभार मानणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हे एक्झिटच्या मोडमध्ये आहेत का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. मुख्यमंत्र्यांकडून लवकरच कुठला मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मंत्रालयातील सर्व सचिवांना थोड्याच वेळात ऑनलाईन संबोधित करणार आहेत. राज्याचे मुख्य सचिव, अतिरिक्त सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहणार आहेत. या व्यतिरिक्त इतर सचिवही उपस्थित राहणार आहेत. सचिवांनी केलेल्या सहकार्याबाबत मुख्यमंत्री सचिवांचे आभार मानणार आहेत. मंत्रालयातील कर्मचारीही यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे हे संकेत असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी काल जनतेचे आभार मानले आणि आज ते मंत्रिमंडळातील सचिव आणि अधिकाऱ्यांचे आभार मानणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.