तुम्ही पुन्हा निवडून येऊनच दाखवा, बंडखोर आमदारांना ओपन चॅलेंज

ईडीच्या भीतीने पक्ष सोडून दोन- चार लोक म्हणजे शिवसेना पक्ष नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही आमदाराला थांबण्याचे आवाहन केलेले नाही. पण मी एवढंच सांगतो की, या आमदारांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावेच, असे जाहीर आव्हान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी बंडखोर आमदारांना दिले. जो कुठल्या तणावाखाली येऊन पक्ष सोडतो तो बाळासाहेबांचा भक्त नसतो, आम्ही आहोत, आमच्यावरही मोठा दबाव आहे, गेल्या ४ दिवसांपासून एक मंत्री सतत ईडीच्या कार्यालयात जात आहे, त्याने पक्ष नाही सोडला, मी आणि माझ्या कुटुंबावर ईडीचा दबाव आहे, आम्ही आजही ठाकरे कुटुंब आणि पक्षासोबत राहू, अखेरच्या श्वासापर्यंत राहू, असे संजय राऊत यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. (Shivsena leader Eknath Shinde Revolt).

यावेळी संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेना पक्ष म्हणून शाबूत असल्याचा दावा केला. बंडखोर कोण आहेत? शिवसेना पक्ष आणि स्वतंत्र विधीमंडळ पक्ष हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ईडीची भीती आणि इतर काही आमिषाला बळी पडून आमदार जात असतील, तर ते म्हणजे पक्ष नाही. काल जो रस्त्यावर आपण पाहिला तो पक्ष आहे. उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्त्वाखाली पक्ष मजबूत आहे. चार आमदार, २ खासदार, २ नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही होत, हे का सोडून गेलेत याची कारणही लवकर समोर येतील, त्यांच्याशी चर्चा सुरु, जबरदस्तीने त्यांना तिथे नेल्याच्या तक्रारी येत आहेत.

आज नितीन देशमुख (Nitin Deshmukh) आणि कैलास पाटील (Kailas Patil) यांची पत्रकार परिषद आहे ते तुम्हाला सर्व सांगतील. अशा प्रकारे किमान १७ ते १८ आमदार हे भाजपच्या कब्जात आहेत. मी भाजप हाच शब्द वापरेण. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजप शासित राज्यात अशाप्रकारे आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

माझ्या चेहऱ्यावर कुठलाही तणाव नाही, या पद्धतीच्या संकटाचा सामन करण्याचा आम्हाला अनुभव आहे. आम्ही बाळासाहेबांसोबत वर्षानुवर्ष काम केलं आहे. फक्त बाळासाहेबांचे भक्त आहे असं म्हटल्याने काही होत नाही, अशी खोचक टिप्पणीही यावेळी खासदार संजय राऊत यांनी केली.

Please follow and like us: