उद्धव ठाकरेंच्या पाठिशी ममता बॅनर्जी ? गुवाहाटीतील हॉटेलवर तृणमूलचे कार्यकर्ते

महाराष्ट्रातील सत्तेचा सस्पेन्स वाढत असून सुरतेतील आमदार आसामच्या गुवाहटीला पोहोचल्यानंतर मोठ्या घडामोडींना वेग आला आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे आणि पर्यायानं महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलंय. जवळपास ४१ आमदार सोबत असल्याचा दावा त्यांनी केलाय. अपक्षांसह काही खासदारही पोहोचत असल्याचं वृत्त आहे. सध्यातरी शिंदेंनी सेनेला मोठं भगदाड पाडलंय. स्वत: प्रतोद नेमला आणि खरी शिवसेना त्यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. यानंतर राज्यातील सत्ताकेंद्र बदलल्याचं स्पष्ट झालंय. (Maharashtra Politics)

एकनाथ शिंदे यांना ऑफर देण्यासाठी भाजपचे नेते सतत सूरतच्या हॉटेलवर येत होते. यानंतर आसाममध्येही सरकारचे मंत्री असलेले अशोक सिंघल शिंदेंच्या (Eknath Shinde) भेटीला गेले. फडणवीस दिल्लीतून सूत्र हालवत असल्याचं कळतंय. मात्र यात उद्धव ठाकरेंनी वेगळी खेळी केल्याचं म्हटलं जातंय. कारण ठाकरेंना समर्थन देणाऱ्या आणि कट्टर भाजप विरोधक तृणमूल पक्षाने एकनाथ शिंदेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंच्या मदतीसाठी चाल खेळल्याची माहिती मिळत आहे. (Maharashtra Political Crisis)

गुवाहाटीतील ‘रॅडिसन ब्लू’ हॉटेलबाहेर आंदोलन करणाऱ्या टीएमसी नेते आणि कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आसाममधील सुमारे 20 लाख लोक पुरामुळे त्रस्त आहेत. पण मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार पाडण्यात व्यस्त आहेत, असा आरोप तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी केलाय. महाराष्ट्राचे बंडखोर आमदार हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्यांच्या दिमतीला आमचे आसामचे मंत्री पोहोचत आहेत. त्यामुळे आम्ही आंदोलन करत असल्याचं तृणमूलच्या नेत्यांनी म्हटलंय.

आसाममध्ये मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. मात्र भाजप सरकार या ठिकाणी लक्ष्य न देता महाराष्ट्राच्या राजकारणाकडे प्राधान्य देत आहेत. यामुळे या ठिकाणी मोर्चा करत असल्याचं कार्यकर्ते म्हणाले.

Please follow and like us: