TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 2 जुलै 2021 – भाजपशासित उत्तराखंड राज्यात मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. यावरुन अनेक राजकीय तर्क वितर्क लावले जात आहेत. तीरथ सिंह रावत यांनी संवैधानिक संकट आले आहे, असं सांगत राजीनाम दिला आहे. त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपला राजीनामा सादर केला आहे.

याबाबत त्यांनी जेपी नड्डा यांची भेट घेऊन चर्चाही केली आहे. ते शुक्रवारी (2 जुलै) देहरादूनला पोहचले. आज रात्री ते पत्रकार परिषद घेण्याची शक्यता आहे. तर शनिवारी (3 जुलै) भाजप आमदारांची बैठक बोलाविली असून यात नरेंद्र सिंह तोमर निरिक्षक असणार आहेत

जेपी नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात संविधानाच्या कलम 164-अ चा उल्लेख करत तीरथ सिंह रावत म्हणाले कि, मुख्यमंत्र्यांना 6 महिन्याच्या आत विधानसभा सदस्य होणं गरजेचं आहे.

मात्र, कलम 151 प्रमाणे राज्यातील विधानसभा निवडणुका होण्यास केवळ 1 वर्षाचा कालावधी शिल्लक असेल तर पोटनिवडणूक घेता येत नाही. त्यामुळे राज्यात संवैधानिक संकट तयार होऊ नये, म्हणून मी राजीनामा देऊ इच्छित आहे.

उत्तराखंड विधानसभा निवडणूक 2022 मध्ये होणार आहेत. या पार्श्वभूमीवर तीरथ सिंह रावत यांना भाजप अध्यक्ष नड्डा यांनी दिल्लीला बोलावलं होतं.

त्यांच्याशिवाय भाजप नेते सतपाल महाराज व धन सिंह रावत यांनाही दिल्लीला बोलावणं आलं. उत्तराखंडमध्ये धन सिंह रावत, सतपाल महाराज आणि पुष्कर धामी मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीमध्ये आहेत.