हडपसर येथून हैदराबादसाठी Special Train आठवड्यातून 3 दिवस ; Railway च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली पहाणी

टिओडी मराठी, पुणे, दि. 3 जुलै 2021 – पुण्यातून हैदराबादला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, कोरोनामुळे आणि इतर कारणांमुळे हडपसर रेल्वे टर्मिनस येथून धावणाऱ्या रेल्वेचा मुहूर्त सातत्याने पुढे सरकत होता.मात्र, आता हडपसर-हैदराबाद मार्गावर त्रिसाप्ताहिक विशेष रेल्वे दि.9 जुलै 2021 पासून धावणार आहे. याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शुक्रवारी हडपसर रेल्वे टर्मिनसची पाहणी केली. सध्या येथे विविध कामे सुरू आहेत.

ही विशेष रेल्वे हडपसर येथून मंगळवारी, शुक्रवारी व रविवारी दुपारी 3.30 वाजता सुटणार आहेत. ती दुसऱ्या दिवशी पहाटे 3.35 वाजता हैदराबाद येथे पोहोचणार आहे.

तर 8 जुलैपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 8.35 वाजता सुटणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.50 वाजता हडपसर टर्मिनस येथे पोहोचणार आहे.

ही रेल्वे दौंड जंक्‍शन, कुर्डुवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, उदगीरमार्गे धावणार असून या ट्रेनमध्ये केवळ ‘कन्फर्म’ तिकीट असणाऱ्यांना प्रवेश मिळणार आहे.

या दरम्यान, येथून रेल्वे सेवा सुरू झाल्यानंतर प्रवाशांना अडचणी येऊ नयेत. या स्थानकावर सुविधा व्हाव्यात, या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. याशिवाय पुढील आठवड्यात उर्वरित सेवांची कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Please follow and like us: