TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 25 जुलै 2021 – चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची आज मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली. यावेळी पुरामुळे ज्यांची शेती, घरदार आणि दुकानाचे नुकसान झाले आहे, त्यांना तातडीने मदत केली जाणार आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. यावेळस त्यांच्यासोबत आमदार भास्करराव जाधव, मंत्री अनिल परब आणि अन्य नेते उपस्थित होते.

राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहा:कार माजवला आहे. यात प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील विशेष करुन महाड व चिपळूणला या पवसाचा फटका बसला आहे. चिपळूणमध्ये पूरामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या मुसळधार पावसामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झालेत.

चिपळूणमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मदतीचे आश्वासन दिले आहे. आपण हवामान बदल हा शब्द ऐकून होतो, आता त्याचा फटका बसू लागलाय.

काल मी महाडमधील तळीये गावात गेलो होतो. तिथे वर्षानुवर्षे असलेल्या गावांवर दरडी कोसळत आहेत. क्षणार्धात या दरडीखाली लोक दबले आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

अचानक ढगफुटी होत राहते. महापूर येतो, जीवितहानी तसेच आर्थिकहानी होते. पिकांचही नुकसान होतं. हे आता दरवर्षी होतय, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

तसेच, तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी चिपळूणच्या बाजारपेठेतील व्यावसायिक आणि दुकानदारांना धीर दिला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, माझ्याकडे दोन-चार दिवसामध्ये अहवाल येणार आहे. राज्यातील पूरपरिस्थितीतील नुकसानीचा आर्थिक आढावा घेण्यात येणार आहे.

मात्र, आत्ता लगेच तातडीची मदत म्हणून अन्न, औषध, कपडेलत्ते आणि इतर आवश्यक गोष्टी पूरग्रस्तांना तात्काळ देण्याबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांना निर्देश दिलेत.

अहवाल आल्यावर सर्वकष मदत केली जाणार आहे. केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी आत्ता लगेच काहीतरी घोषणा करणार नाही, असे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, केंद्राकडून देखील काय आणि किती मदत मागायची? ते ठरवता येईल. जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना तशा सूचना दिल्यात. मदत करताना तांत्रिक मुद्द्यांवर अडचणी येऊ नये, या संदर्भातील सूचना मी प्रशासनाला केल्यात.

यापुढे अशा घटना घडू नये म्हणून पूर व्यवस्थापन करणारी योग्य यंत्रणा कार्यान्वित करणार आहोत. आर्थिक मदत सुद्धा करू, एक आढावा येऊ द्या. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा यांचा एकत्रिच आढावा घेऊन लवकरात लवकर मदत घोषित करू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.