TOD Marathi

शिवसेनेतील आमदारांसह 9 मंत्र्यांनी देखील मोठं बंड केलं आहे. आणि या बंडाला मोठा कालावधी लोटत आहे. मात्र यामुळे जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी होणे, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पडली पाहिजेत यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. (CM Uddhav Thackeray shifted portfolio of ministers)

महाराष्ट्र शासन (Maharashtra Goverment) कार्यनियमावलीतील नियम ६-अ मध्ये ६-अ अनुपस्थिती, आजारपण किंवा इतर कोणत्याही कारणामुळे आपली कामे पार पाडणे शक्य नसेल त्यावेळी मुख्यमंत्र्यांस आपल्या अनुपस्थितीत आपली सर्व किंवा कोणतीही कामे पार पाडण्याबाबत इतर कोणाही मंत्र्यास निर्देश देता येतात, त्याचप्रमाणे जेव्हा एखाद्या मंत्र्याला आपली कामे पार पाडणे शक्य नसेल तेव्हा त्या मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निर्देशही देता येईल अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित मंत्री व राज्यमंत्री यांच्याकडील विभागांचे काम त्यांच्या नावांसमोर दर्शविण्यात आलेल्या मंत्री व राज्यमंत्री यांचेकडे पुढील आदेशापर्यंत सोपविण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्याकडे देण्यात आली आहेत, गुलाबराव पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल परब यांच्याकडे, दादाजी भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकरराव गडाख यांच्याकडे, उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.

याबरोबरच राज्यमंत्र्यांचे (Minister of States Maharashtra) देखील खाते बदल करण्यात आलेले आहेत. यामध्ये शंभूराज देसाई यांच्या कडील खाती विश्वजीत कदम यांच्याकडे, राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि अब्दुल सत्तार यांच्याकडील खाती अदिती तटकरे यांच्याकडे, बच्चू कडू यांच्या कडील खाते दत्ता भरणे यांच्याकडे देण्यात आली आहेत.