TOD Marathi

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार अस्थिर झाल्याचं चित्र आहे. यातून शिवसेना सावरण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेनेची खिंड जोरदार लढवणारे शिवसेनेचे आक्रमक नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने समन्स (ED summoned Sanjay Raut) पाठवले आहे. त्यावर संजय राऊतांनी ट्वीट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut tweeted)

‘आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत, या आणि मला अटक करा’,

अशा शब्दात राऊतांनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे ईडीच्या समन्सनंतरही राऊतांचा बाणा मात्र कायम आहे.

संजय राऊत यांचं ट्वीट काय?
“मला आताचा समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान, महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्विकारणार नाही. या मला अटक करा”, असं ट्वीट संजय राऊतांनी केलंय.

ईडीने संजय राऊत यांना पत्राचाळ प्रकरणात चौकशी करण्यासाठी समन्स पाठवले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात ईडीने पत्राचाळ प्रकरणातच संजय राऊत यांच्या मुंबई आणि अलिबाग येथील काही मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये संजय राऊत यांच्या मुंबईतील राहत्या घराचाही समावेश होता. गोरेगावमधील पत्राचाळ जमीन प्रकरणात १०३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यापैकी काही पैसे संजय राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे. याच पैशातून संजय राऊत यांनी अलिबागमध्ये भूखंड खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचे निकटवर्यीय मित्र प्रवीण राऊत यांनाही ईडीने अटक केली होती. त्यांच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीच्याआधारे ईडीने संजय राऊत यांच्या संपत्तीवर टाच आणली.