TOD Marathi

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी आज दिवसभरातील सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत. सततचे दौरे आणि उशिरापर्यंत चालणाऱ्या सभा यांमुळे मुख्यमंत्र्यांना थकवा आल्याची माहिती आहे. त्यामुळे डॉक्टरांकडून एकनाथ शिंदेंना सक्तिच्या विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis)  यांनी देखील आपले सर्व कार्यक्रम रद्द करत तेही दिल्लीला रवाना झाले आहेत. देवेंद्र फडणवीस पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदे यांनी २० जूनला बंड पुकारल्यानंतर विविध ठिकाणी त्यांचा प्रवास झाला. त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यांनी भाजपसोबत सत्तास्थापन केली आणि शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवण्यात आलं. ३० जूनला मुंबईत येऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तेव्हापासून त्यांचे सतत दौरे, सभा, भाषणं, पत्रकार परिषदा असे अतिव्यस्त वेळापत्रक पाहायला मिळत आहे.

गेल्या महिनाभरात विविध दौरे असोत, पंढरपूर वारी, महाराष्ट्र दौरा यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना एक दिवस सक्तीचा आराम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेंनी आज एक दिवसाच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द केल्या आहेत.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या ८ ऑगस्टला होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगालाही कोणताही निर्णय घेण्यास मनाई केली आहे. दरम्यान, मंत्रिमंडळाचा विस्तार ठरलेल्या वेळी होणार की आणखी लांबणीवर पडणार, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.