औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना राज्यातील जनतेच्या वतीने अभिवादन केल्यानंतर भाषण करताना त्यांनी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली आहे. तसंच निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्यासाठी विकासासाठी योजनांचा पाढा वाचून त्यांनी थेट एमआयएमला प्रत्युत्तर दिलं आहे.
सकाळी ९ वाजता मुख्यमंत्र्यांनी सिद्धार्थ उद्यान येथे स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करुन मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन केलं. त्यानंतर त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. या दौऱ्याला एमआयएम आणि भाजप पक्षाचा विरोध होता. मात्र ध्वजारोहण झाल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरेंनी भाषण केले आणि भाषणात चांगलेच प्रत्युत्तर त्यांनी विरोधकांना दिलं आहे. आज ज्याने ज्याने मला धन्यवाद म्हणून बोर्ड दाखवले, त्यांना मला सांगायचं आहे की आमचा विकास आता सुरु झाला आहे, आणि अजून खूप होणार आहे. बोलघेवडे सरकार काही कामाचं नसतं, असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
या भाषणादारम्यान मुख्यमंत्र्यांनी आठ महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्यात सर्वात आधी मराठवाड्यासाठी संतपीठाची घोषणा केली, निजामकालीन 150 शाळांचा पुनर्विकास करणार, औरंगाबाद आणि अहमदनगर रेल्वेने जोडण्याचं मुख्यमंत्र्यांचं रेल्वे राज्यमंत्र्यांना आवाहन, औरंगाबाद आणि शिर्डी विमानसेवा सुरु करण्याची संकल्पना, मराठवाड्यासाठी 200 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्प उभारणार, घृष्णेश्वर सभामंडप, औरंगाबादचे पर्यटन समृद्ध करणार आणि परभणीत शासकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.