केंद्राने कडधान्यावरील Stock Limit चा अद्यादेश त्वरित मागे घ्यावा, अन्यथा शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल – राजकुमार सस्तापुरे

टिओडी मराठी, लातूर, दि. 8 जुलै 2021 – केंद्र सरकारने कडधान्यावरील स्टॉक लिमीटचा अद्यादेश त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना लातूरचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना लिहलं आहे. तसेच जर हा स्टॉक लिमीटचा अद्यादेश त्वरित मागे घेतला नाही तर, शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देखील त्यांनी याद्वारे दिला आहे.

त्यांनी निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्र सरकारने मूग वगळून इतर हरभरा,तूर, उडीद, वाटाणा, मसूर आदी कडधान्यावर स्टॉक लिमिट लावले आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी आणि दाळ उद्योग करणाऱ्याला 100 टनापेक्षा अधिक माल स्टॉक करता येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याकडून कडधान्य घेणे व्यापाऱ्यांनी बंद केलं आहे. परिणामी कडधान्याचे भाव हे 300 ते 400 रुपयांनी कोसळले आहेत. यात अधिक नुकसान शेतकऱ्यांचे होत आहेत.

जर व्यापाऱ्यांकडे 100 टनापेक्षा अधिक माल सापडला तर तो माल जप्त करण्याचा आदेश देखील याद्वारे सरकारने दिला आहे. त्यामुळे हा निर्णय देशातील कडधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि दाळ उद्योगासाठी हानिकारक आहे.

एकीकडे शेतकऱ्याला स्वतंत्र बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची भाषा केली जाते. आणि दुसरीकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आदेश, बंधने लावून शेतकऱ्यांच्या मालाचे दर पाडले जातात. यावेळी केंद्र सरकारने देशांतर्गत कडधान्यावरील स्टॉक लिमिट लाऊन शेतकऱ्यांच्या मालाचे दर पाडले आहेत.

या निर्णयामुळे देशातील व्यापाऱ्यांनी देशव्यापी बेमुदत बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील तीन दिवसांपासून बाजार समित्या बंद आहेत. यामुळे देशातला शेतकरी आडचणीत आला आहे.

त्यामुळे देशातील शेतकऱ्याच्या मालाला योग्य दर देण्यासाठी आणि शेतकऱ्याचा माल खपण्यासाठी व्यापाऱ्यांवर लावलेला कडधान्यावरील स्टॉक लिमिटचा अद्यादेश त्वरित मागे घ्यावा. अन्यथा, शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा राजकुमार सस्तापुरे यांनी दिला आहे.

Please follow and like us: