TOD Marathi

टिओडी मराठी, बंगळूर, दि. 13 ऑगस्ट 2021 – कर्नाटक राज्यामध्ये सत्तारूढ भाजपच्या एका आमदाराने गुरूवारी स्वपक्षाच्याच राज्य सरकारविरोधामध्ये निदर्शने केली. हि घडामोड सरकारबरोबरच भाजपची नाचक्की करणारी ठरली आहे.

मुदिगेरे मतदारसंघाचे आमदार एम.पी.कुमारस्वामी यांनी विधानसभेच्या प्रांगणामध्ये एकट्यानेच निदर्शने केली. आपल्या मतदारसंघावर अन्याय होत आहे, असा आरोप स्वपक्षाच्या सरकारवर करणारा फलक त्यांनी झळकावला.

गेल्या दोन वर्षांपासून माझ्या मतदारसंघाला सातत्याने पाऊस, पूर आणि दरडींचा तडाखा बसत आहे. मात्र, अनेकदा मागणी करूनही जनतेला नुकसान भरपाई दिलेली नाही. आमच्याच पक्षाचे सरकार असूनही भरपाईबाबत दुर्लक्ष केलं जात आहे, अशी भूमिका नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली आहे.

कर्नाटकमध्ये नव्या मंत्रिमंडळाच्या रचनेनंतर भाजपमधील असंतोष चव्हाट्यावर आलाय. कुमारस्वामी यांच्या निदर्शनांकडे त्याचा भाग म्हणूनही पाहिले जात आहे.

कुमारस्वामी हेही मंत्री बनण्याची आकांक्षा बाळगून होते. मात्र, मंत्रिपदाने त्यांना हुलकावणी दिलीय. हीच नाराजी उघड करण्यासाठी त्यांनी निदर्शनांचा मार्ग अवलंबल्याचे मानले जात आहे.