TOD Marathi

टिओडी मराठी, काबूल, दि. 13 ऑगस्ट 2021 – तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी हल्ले सुरू केले आहेत. यादरम्यान, अफगाणिस्तानला भारताने भेट दिलेल्या हेलिकॉप्टरवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबानने केलाय.

अफगाणिस्तानमधील कांडुजमधून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओत हे हेलिकॉप्टर तालिबानी लढाऊ हेलिकॉप्टरच्या शेजारी दिसत आहे. या हेलिकॉप्टरचे रोटर ब्लेड गायब झालेत.

तालिबानने हे ब्लेड हेलिकॉप्टरचा वापर हल्ला करण्यासाठी वापरू नये, यासाठी पूर्वीच अफगाणिस्तानच्या सैन्याने काढून टाकल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२०१९ साली तीन चित्ता हेलिकॉप्टर्ससह Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर भारताने अफगाण हवाई दलाला भेट दिले होते. Mi-24 हे लढाऊ हेलिकॉप्टर २०१५ मध्ये अफगाणिस्तानला भेट दिलेल्या चार लढाऊ हेलिकॉप्टरच्या बदल्यात देण्यात आले होते.

हल्लेखोरांचा सामना करण्यासाठी अफगाणिस्तानचे नेतृत्व संघर्ष करताना हे हेलिकॉप्टर तालिबानने ताब्यात घेतले. आता अफगाणिस्तानच्या ६५ टक्के भूभागावर तालिबानने नियंत्रण मिळवले असून गुरुवारी तालिबानने दक्षिण अफगाणिस्तानातील प्रांतीय राजधानीतील पोलीस मुख्यालय ताब्यात घेतले आहे.

राजधानी काबुलपासून १५० किलोमीटरवर असलेल्या गजनी शहरावरही तालिबानने ताबा मिळवलाय. अफगानिस्‍तानमधून अमेरिकन आणि नाटो सैनिक हटल्यानंतर तिथे तालिबान्यांचे वर्चस्व वाढले आहे. परिस्थिती गंभीर होत असल्यामुळे अफगानिस्तानमधून लोक पलायन करत आहेत.