राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे ( Eknath Khadse ) यांचं पोलीस स्टेशन बाहेरील आंदोलन म्हणजे जेलमध्ये जाण्याचा सराव आहे. असा हल्लाबोल भाजप आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांनी केला आहे. जिल्हा दूध संघ अपहार प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या परिवारासह मोठ्या टोळीचा समावेश आहे, आणि या टोळीचे प्रमुख सूत्रधार एकनाथ खडसे आहेत असं आमदार मंगेश चव्हाण यांनी म्हटलं आहे.
जिल्हा दूध संघ प्रकरणात भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) यांनी पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले. जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणात मोठे टोळी सक्रिय असून एकनाथ खडसे हे त्या टोळीचे प्रमुख आहेत. असा गंभीर आरोप मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांच्यावर केला. जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटी रुपयांची चोरी झाल्याचा आरोप करत गुन्हा दाखल व्हावा, या मागणीसाठी एकनाथ खडसे यांनी शहर पोलीस ठाण्यात तब्बल नऊ ते दहा तास ठिय्या आंदोलन केले होते. या आंदोलनावर आमदार मंगेश चव्हाण यांनी एकनाथ खडसे यांना चांगलाच टोला लगावला आहे.
दूध संघाच्या प्रकरणात मी सुरुवातीला जी तक्रार दिली, ज्यांच्याविरुद्ध माझी तक्रार आहे तेच आंदोलन करतात आणि तेच पोलिसात फिर्याद देतात, ही आश्चर्यकारक बाब असून एकनाथ खडसे ( Eknath Khadse) आता बाहेर आहेत मात्र ते जेलमध्ये जाण्याचा सराव करत असल्याचा टोला आमदार मंगेश चव्हाण यांनी लगावला आहे.
एकनाथ खडसेंच्या तब्बल आठ तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली होती. दूध संघात अपहार नव्हे तर दूध संघात चोरी झाल्याची माहिती एकनाथ खडसेंनी दिली होती, जिल्हा दूध संघात एक ते दीड कोटीचा अपहार झाल्याचा आरोप करत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी एकनाथ खडसे यांचं शहर पोलीस ठाण्यात आंदोलन सुरू होतं. मात्र, पोलिसांकडून कुठलीही तक्रार अथवा गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. पोलीस या प्रकरणात कुठलीही नोंद घेत नसल्याने यावेळी एकनाथ खडसे यांच्यासह पदाधिकाऱ्यांना चांगलाच संताप झाला होता. तब्बल आठ तास उलटल्यानंतर या प्रकरणात पोलिसांनी दूध संघाचे कार्यकारी संचालक मनोज लिमये यांची फिर्याद घेतली तर दुसरीकडे दूध संघात अपहार झाला आहे असे आंदोलन सुरू झाल्यापासून सांगणाऱ्या एकनाथ खडसेंनी यूटर्न घेत आता या प्रकरणात अपहार नव्हे तर चोरी झाल्याचे सांगितले होते. दरम्यान, त्यांच्या या आंदोलनामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.