TOD Marathi

देशाचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न आणि जगभरात मिसाईल मॅन म्हणून ओळख असलेले डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम (Birth Anniversary of Dr A P J Abdul Kalam) यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. विविध कार्यक्रमही सरकारच्या वतीने घेतली जातात. शाळा, महाविद्यालयांमध्ये ही अनेक कार्यक्रमांचं आयोजन या निमित्ताने केला जातं.

दरम्यान, प्रा. हरी नरके यांनी त्यांच्या संदर्भात एक वादग्रस्त पोस्ट लिहित अब्दुल कलामांचा वाचनाशी संबंध काय? (Hari Narke writes a pot on it) असा प्रश्न उपस्थित केला. अब्दुल कलाम हे एक इंजिनियर होते पण त्यांना काही मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकलं. मला सांगा कलामांनी असा कोणता शोध लावला? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यानंतर त्यांची ही पोस्ट चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. यावर अनेक लोकांनी प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.

काय आहे प्रा. हरी नरके यांची पोस्ट?

कलामांचा वाचनाशी संबंध काय? प्रा. हरी नरके

विभुतीपुजा आणि दैवतीकरण या मध्यमवर्गाच्या लाडक्या गोष्टी. एखादी व्यक्ती जर हिंदुत्ववादी असेल तर त्या सुमार किंवा B+ श्रेणीतील व्यक्तीचा विशेष प्राविण्य गटात समावेश करून त्याच्या आरत्या ओवळायला मध्यमवर्गाला फार आवडते. उदा. आंबापुत्र किडे गुरुजी म्हणे अणुशास्त्रज्ञ आहेत. उद्या हे मोबाईल मेकॅनिक, स्टो दुरुस्त करणारे, स्कूटर मेकॅनिक यांचाही “शास्त्रज्ञ” म्हणून उदोउदो करतील.

१) APJ अब्दुल कलाम हे एक इंजिनियर (तंत्रज्ञ, टेक्निशियन) होते. पण त्यांना या मंडळींनी शास्त्रज्ञ घोषित करून टाकले. मला सांगा कलामांनी असा कोणता शोध लावला? मिसाईल बनवणे हे संशोधन नव्हे. ती एक मशीन आहे. तिचा शोध कलामांनी लावलेला नाही. तो जर्मनीत लागला.तेव्हा कलाम पाळण्यात होते.

हे म्हणजे चहा विकणारा माणूस हाच चहाचा संशोधक असल्याचे ढोल पिटणे होय.

२) कलामांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस का? किती ग्रंथसंग्रह होता कलामांचा? कोणती पुस्तके त्यांनी वाचली होती? ग्रंथसंस्कृती, वाचन संस्कृती यांच्या विकासाला कोणता हातभार त्यांनी लावला? माणूस मुस्लिम असून शंकराचार्यांच्या पुढे लोटांगण घालीत होता, यापलीकडे कलामांचे कला, साहित्य,संस्कृती, वाचन, ग्रंथजगत, यासाठी योगदान काय? त्यांनी गरिबीत दिवस काढले. हे खरेच आहे की त्यांचे आत्मचरित्र वाचनीय आहे. ते सतत प्रकाशझोतात असणारे शासकीय अधिकारी होते. हिंदुत्ववाद्यांचे ते डार्लिंग होते.म्हणून त्यांना भारत रत्न व राष्ट्रपतीपद दिले गेले.

३) राष्ट्रपती म्हणून त्यांचे देशाला विशेष योगदान काय होते?

४) संसदेच्या प्रांगणात महात्मा जोतीराव फुले यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण होणार होते. तेव्हा कलाम राष्ट्रपती असल्याने त्यांच्या हस्ते ते व्हावे म्हणून आम्ही त्यांना निमंत्रण दिले.

कोण महात्मा फुले? असे विचारून त्यांनी या कार्यक्रमाला यायला थेट नकार दिला. त्यांचे वाचन, त्यांचे जनरल नॉलेज इतके थोर होते की त्यांना महात्मा फुले माहीतच नव्हते.

( पुतळ्याचे अनावरण उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष व विरोधी पक्षनेते यांच्या उपस्थितीत पार पडले. )

५) आज महाराष्ट्रातली साक्षरता ९० टक्क्यांपेक्षा अधिक असून त्यातल्या सर्वांनी वाचन करावे असे प्रयत्न झाल्यास वाचनसंस्कृती आणखी वाढेल व ती वाढलीच पाहिजे. त्यासाठी आपण सर्वांनी झटायला हवे. पण वाचन कमी होतेय अशी नकारात्मक बोम्ब मारल्याने हे काम पुढे जाईल की मागे?

६) ज्याकाळात शिक्षण ही फक्त ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य पुरुषांची मक्तेदारी होती तेव्हा स्त्रियांमध्ये शून्य टक्के वाचन असणार. ते आता वाढलेय की शूण्याच्याही खाली गेलेय? जेव्हा बलुतेदार, अलुतेदार, दलित, आदिवासी,भटके निरक्षर होते तेव्हा पालावर, पाड्यावर, झोपडीत, शेतात वाचन नसणारच. आता हे घटक शिकल्यावर तिथे जे काही वाचन होतेय ते का मोजले जात नाहीये? की जसे टी.आर.पी मोजताना हे लोक विचारात घेतले जात नाहीत, तसच इथंही चालुय? ज्या लोकांना “आम्ही मूठभर म्हणजेच देश” असे वाटते, ते वाचतात म्हणजे देश वाचतोय, त्यांचे वाचन कमी झाले म्हणजे थेट देशाचे वाचन कमी झाले असे वाटते त्यांनी केलेली ही ओरड दिशाभूल करणारी आहे. खोटी आहे. आज जिथे वाचनालये व पुस्तक विक्री केंद्रे आहेत तिथले १०% लोक वाचतात. हे आजवरचे सर्वोच्च वाचन असले तरी त्यात आणखी खूप वाढ व्हायला हवीच.

७) वाचन कमी झालंय असं बोलणारे केवळ ओपिनियनमेकर आहेत म्हणून तुम्हीही (स्वतंत्र विचार न करता) त्याच कळपात सामील होणार का? की नव्या घरांमध्ये होऊ लागलेल्या वाचनाचे स्वागत करणार? ते आणखी वाढावे यासाठी सक्रिय होणार? वाचनाने करमणूक, ज्ञान, आधुनिकता आणि माणूसपण समृद्ध होते.

– प्रा. हरी नरके,