TOD Marathi

नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला आहे. केंद्र सरकारने काही मोठ्या घोषणा केल्या आहे. ज्यामध्ये, अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, रिझर्व्ह बँकेने २०२२-२३ पासून ब्लॉकचेनच्या तंत्रज्ञानाचा वापर करून ‘डिजिटल रुपया’ सादर करण्याचा प्रस्ताव दिला आहे. तसेच, क्रिप्टोकरन्सीवर कर आकारणी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

भारताचे स्वतःचे डिजिटल चलन सुरू केले जाईल:
अर्थमंत्री निर्मला सीतारामन अस म्हणतात की, डिजिटल चलनाच्या येण्याने डिजिटल अर्थव्यवस्थेला खूप गती मिळेल आणि चलन व्यवस्थापन प्रणाली स्वस्त होईल. या डिजिटल चलनाला आपल्या देशाची क्रिप्टोकरन्सी असेही म्हणता येईल. अर्थमंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे की, ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून, या वर्षापासूनच म्हणजेच २०२२ पासून भारतीय रिझर्व्ह बँक देशाचे स्वतःचे डिजिटल चलन सुरू करेल.

बिटकॉइन कमाईवर ३० % कर:
अर्थसंकल्पात बिटकॉइनवर बंदी घालण्याबाबत अद्यापही काहीही नमूद करण्यात आले नाही. पण आतापासून बिटकॉइन च्या कमाईवर कर आकारण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. आभासी डिजिटल मालमत्तांवर ३० % कर आणि १ % TDS देखील या डिजिटल मालमत्तांच्या आभासी हस्तांतरणासाठी लागू होणे हे, बिटकॉइन आणि इतर क्रिप्टोकरन्सीच्या गुंतवणूकदारांसाठी हे आश्चर्यकारक आहे. जर क्रिप्टोकरन्सी एखाद्याला भेट म्हणून दिली असल्यास भेटवस्तू प्राप्तकर्त्याला कर भरावा लागेल.