TOD Marathi

पंजाब: राज्यातील राजकारण अत्यंत वेगळे वळण घेत असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला असल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना त्या संदर्भात पत्र देखील पाठवले आहे.

सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, ते काँग्रेस पक्षाचे सदस्य राहतील. आज पंजाबमध्ये नवीन मंत्र्यांचे खातेवाटप झाले आहे आणि काही तासांनंतर सिद्धू यांनी सोनिया गांधींना आपला राजीनामा पाठवला. यामागे काही महत्वाची कारणे आहेत.

जेव्हा पंजाबमध्ये मंत्र्यांची नावे ठरवली गेली, तेव्हा राहुल गांधींनी पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी बोलून हे ठरवले. यात नवज्योतसिंग सिद्धू यांचा कुठेही समावेश नव्हता. पहिल्या दिवसाच्या बैठकीत त्यांना निश्चितपणे बोलावण्यात आले होते. पण, जेव्हा राहुल गांधी शिमलाहून परतले तेव्हा सिद्धू यांना बैठकीत सामील करण्यात आले नव्हते. आता पंजाबचे राजकारण कुठल्या वळणावर जाणार आहे हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे.