TOD Marathi

शिवसेना (Shivsena) आणि शिंदे (Eknath Shinde) गटाचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित दसरा मेळावा (Dasara Melava) बुधवारी मुंबईत पार पडला. अपेक्षेप्रमाणे दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका करण्यात आली आणि शाब्दिक हल्ला चढवण्यात आला. या सगळ्या दरम्यान दिल्लीत निवडणूक आयोगाच्या हालचालींना (Election Commission) वेग आल्याची माहिती आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावर हक्क कोणाचा? याबाबतचा निर्णय सध्या निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. या संदर्भात पुरावे सादर करण्यासाठी आयोगाने दोन्ही गटाला ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती, त्यानुसार काल दसरा मेळावा सुरू असताना शिवसेनेचे काही निवडक पदाधिकारी या संदर्भातील पुरावे घेऊन दिल्लीत पोहोचले होते. शिवसेनेकडून पुरावे सादर करण्यात आल्यानंतर आता निवडणूक आयोगात येत्या काही तासांमध्येच पक्षचिन्ह कुणाचा? याबाबत महत्त्वाचा निकाल दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडून आज काही वकिलांची देखील भेट घेतली जाणार आहे. यामध्ये निवडणूक आयोगा संदर्भात चर्चा होईल निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायची? आणखी कोणते पुरावे सादर केले पाहिजेत? याबाबत खलबतं होऊ शकतात आणि या सर्व कायदेशीर लढाईसाठी आणखी काही अवधी मिळावा अशीही शिवसेनेची भूमिका असू शकते. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपल्याने निवडणूक आयोगाच्या देखील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचं? याबाबत निकाल दिला जाण्याची शक्यता आहे.

त्यामुळे आता निवडणूक आयोगाच्या घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट (Eknath Shinde and Uddhav Thackeray) या दोन गटांमध्ये शिवसेना विभागली गेली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापिठासमोर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा खटला सुरू आहे. त्यामुळे या निवडणुकीत चिन्हाच्या बाबतीत निवडणूक आयोगाची काय भूमिका असेल, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

14 ऑक्टोबर ही अंधेरी पूर्व विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या तारखेपूर्वी शिवसेनेतील पक्ष चिन्ह कुणाचं? याचा निर्णय झाल्यास अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीची समीकरणे पूर्णतः बदलण्याची दाट शक्यता आहे.