TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 11 मे 2021 – करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक कलाकारांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे.मराठी इंडस्ट्री मागील दीड वर्षभरापासून संपूर्ण डबघाईस आलीय. तंत्रज्ञ, तमाशा कलाकार, रंगकर्मी, जादूचा खेळ करणारी, ऑर्केस्ट्रा कलाकार, वाघ्या मुरळी, झाडे- पट्टीचे कलाकार, दशावतार, नमन, वासुदेव, पिंगळा या सर्वांवर रोजगाराअभावी उपासमारीची वेळ आलीय. अशा कलाकारांना जगविण्यासाठी, त्यांना आर्थिक मदत करण्यासाठी मराठीतील मोठे प्रोडक्शन हाऊस, सिलिब्रेटी यांनी पुढे यावं, असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील म्हणाले कि, ज्यांच्या कलेमुळे आणि त्यांच्या योगदानामुळे आज अनेक सेलिब्रिटी व प्रोडक्शन्स बनली आहेत, अशा सर्व प्रॉडक्शन हाऊस आणि सेलिब्रिटींनी आता खऱ्या अर्थाने कलाकारांना थोडी का होईना आर्थिक मदत करावी. तसेच अनेक जिल्ह्यांमध्ये संपर्क साधून अन्नधान्याचे किट वाटप करून त्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे.

मराठी चित्रपट सृष्टी उभी करण्यासाठी दादासाहेब फाळके असोत की व्ही शांताराम या लोकांनी काम करून मराठी इंडस्त्री नावारूपाला आणली. हे करत असताना समर्पित भावनेतून घराला दुय्यम स्थान देऊन आपल्या सोबत काम करणारा तंत्रज्ञ कलावंत आणि छोट्या कलाकार व्यक्तीची सुद्धा काळजी घेतली.

आज आपल्या इंडस्ट्रीत एक म्हण प्रचलित आहे. ‘निर्माता जगला तर, कलाकार जगेल’ त्याचप्रमाणे आता मराठी चित्रपट इंडस्ट्रीत जी सेलिब्रिटी मोठी झालीत किंवा जी प्रोडक्शन हाऊस मोठी झाली आहे. अशा प्रोडक्शन हाउसने त्यामध्ये महेश कोठारे, आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर ,सचिन पिळगावकर, नागराज मंजुळे, अशोक सराफ, मधूर भांडारकर, किरण शांताराम, अवधूत गुप्ते, चंद्रकांत देसाई, राजश्री प्रॉडक्शन, त्याचप्रमाणे अमीर खान यांच्या ‘सत्यमेव जयते’चे टीमने अख्ख्या महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनच्या मार्फत विविध स्पर्धा घेऊन करोडो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट केली, असेही पाटील यांनी म्हटलंय.

अशा अमीर खानने संपूर्ण महाराष्ट्रात जर पुढाकार घेऊन वैद्यकीय मदत केली तर खऱ्या अर्थाने त्यांनी ‘सत्यमेव जयते’ मधून महाराष्ट्रात सुजलाम सुफलाम करण्याचे स्वप्न बघितलं होतं, ते सार्थकी ठरेल.

संगीतच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या लोकसंगीताला जगाच्या पातळीवर नेऊन ठेवणारे प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय – अतुल यांनी कायम ग्रामीण आणि अस्सल लोककलावंत, लोकवादक यांना विविध गाण्याच्या माध्यमातून संधी दिली आहे, परंतु आज कोरोना काळात अशा अनेक गुणी लोकवादकांवर मागील दीड वर्षांपासून कार्यक्रम बंद असल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. म्हणून याकरिता अजय अतुल यांनीही लोककलावंत, यांच्यासाठी पुढे येऊन मदतीचा हात देऊन त्यांना आधार द्यावा, असे पाटील यांनी म्हंटलं आहे.

याचप्रमाणे नाम फाउंडेशनचे मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांनी संस्था सुरू करून शेतकरी तसेच शेतकरी कुटुंबातील लोकांना जीवन जगण्याचा आधार निर्माण करून दिला. त्याच नाम फाउंडेशननी आता पुढाकार घेऊन महाराष्ट्रातल्या कलावंतांसाठी किंबहुना महाराष्ट्रातल्या जनतेसाठी वैद्यकीय सुविधा आणि एक वेळेचे अन्न या संकल्पनेतून पुढाकार घेऊन मदत करावी, असे आवाहन राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चित्रपट सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.