TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 11 मे 2021 – मागील सव्वा वर्षाहून अधिक काळ महाराष्ट्र कोरोनाशी लढत आहे. या काळात कोरोना संसर्ग वाढू नये, यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना राज्यात बंदी घातली होती. यामुळे अनेक लोक कलावंतांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे सर्व लक्षात घेऊन लोककलावंतांना अर्थसहाय्य देण्याबाबत राज्य शासन प्रयत्नशील आहे. या संदर्भातील सर्वसमावेशक प्रस्ताव लवकर केला जाईल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी दिली. महाराष्ट्र राज्यातील कलावंतांच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी ऑनलाइन बैठकीद्वारे संवाद साधला.

यावेळी देशमुख म्हणाले, राज्य शासन लोककलावंतांना आर्थिक सहकार्य देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील सर्व क्षेत्रातील लोककलावंतांना यात सामावून घेतले जाईल. आर्थिक सहकार्य कसे करता येईल? याबाबतचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यासाठी जिल्हाधिकारी यांची मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील लोककलावंतांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. शासनाने मंजूर केलेले अर्थसहाय्य थेट या लोककलावंतांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा होईल.

यावेळी सांस्कृतिक विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी सांगितले की, मागील राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर चित्रीकरणाला परवानगी दिली होती. यासाठी नियमावली तयार केली होती. आता सुद्धा राज्यात कोरोनाचा कमी झाल्यावर नियमावली तयार करून त्यानंतर चित्रीकरण आणि लोककलावंतांना सांस्कृतिक कार्यक्रम करण्याची परवानगी दिली जाईल.

फड मालकांना अनुदान, लॉकडाऊन संपल्यानंतर कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी, लोककलावंतांना रोख मदत, चित्रपटांना सरसकट अनुदान देण्यासंदर्भातील कार्यवाही, लोककलावंतांची नोंदणी, शासनामार्फत देण्यात येणारे अनुदान वेळेवर प्राप्त व्हावे, कलाकारांसाठी ओळखपत्र असे विविध मुद्दे यावेळी ऑनलाइन बैठकीत उपस्थित लोककलावंत प्रतिनिधींनी मांडले.