TOD Marathi

लखनऊ | पबजी खेळता खेळता भारतीय तरुणाच्या प्रेमात पडलेल्या, त्याच्यासोबत लग्न करण्यासाठी अवैधपणे भारतात आलेल्या सीमा हैदरची सध्या तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. मूळची पाकिस्तानची रहिवासी असलेली सीमा नेपाळमार्गे भारतात शिरली. ती बेकायदेशीरपणे भारतात आल्याचं समजताच पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या. मात्र तिला जामीन मिळाला. उत्तर प्रदेश एटीएसकडून सीमा हैदरची चौकशी सुरू आहे. यातच सीमाला केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियानं निवडणुकीचं तिकीट देऊ केलं आहे.

एनडीएचा भाग असलेल्या रामदास आठवलेंच्या रिपाइंनं सीमाला पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. सीमानंदेखील त्यांचं आमंत्रण स्वीकारल्याचं वृत्त ‘आज तक’नं दिलं आहे. सीमाला पक्षाच्या महिला विंगचं अध्यक्षपद दिलं जाण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सीमा सातत्यानं टीव्ही चॅनेल्सना मुलाखती देत आहेत. त्यातून तिचं संवाद कौशल्य, भाषेवरील पकड स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सीमाला पक्षाकडून प्रवक्तेपदही दिलं जाण्याची शक्यता आहे.
सध्या उत्तर प्रदेश पोलीस, दहशतवादविरोधी पथक सीमा हैदरची चौकशी करत आहे. तपास यंत्रणांनी सीमाला क्लिन चीट दिल्यावर तिला निवडणुकीचं तिकीट देण्यात येईल. रिपाइंच्या तिकिटावर ती निवडणूक लढवेल, असं पक्षाकडून सांगण्यात येत आहे. ‘सीमा हैदर पाकिस्तानी नागरिक आहे. ती भारतात आली आहे. जर आपल्या तपास यंत्रणांनी तिला क्लिन चीट दिली तर तिला भारतीय नागरिकत्व मिळू शकतं. सीमाचं पक्षात स्वागत करण्यात येईल. भारतीय नागरिक असलेली कोणतीही व्यक्ती निवडणूक लढवू शकते असं बाबासाहेबांचा कायदा सांगतो,’ असं रिपाइंचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असलेल्या मासूम किशोर यांनी सांगितलं.