TOD Marathi

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील जनतेशी संवाद साधतात. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमाद्वारे जनतेशी संवाद साधत, जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. महिन्यातून दोन वेळा हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र यांचा ‘मन की बात’ हा रेडिओवरील प्रयोग यशस्वी ठरला होता. त्यानंतर २०१७ साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ कार्यक्रमातून राज्यातील शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधला होता. तसेच, आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत.

हेही वाचा ” …“मी पोटतिडकीनं भाषण करायचो, पण उत्तर मात्र…,” फडणवीसांचा ठाकरेंना टोला” 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या सभा विविध जिल्ह्यांमध्ये घेत आहेत. त्यासभेअंतर्गत सरकारी योजनांचा जाग मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून केला जातो. या सभांना प्रतिसाद मिळत असल्याचा दावा सरकारकडून सतत केला जातो. अशातच मुख्यमंत्री शिंदे ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, असे म्हणत जनतेच्या प्रश्नांना सामोरे जाणार आहेत.

‘मी मुख्यमंत्री बोलतोय’, हा कार्यक्रम महिन्यातून दोनदा आणि वर्षातून चोवीस वेळा प्रदर्शित होणार आहे. दूरचित्रवाहिन्या आणि रेडिओवर नव्या स्वरुपातील हा कार्यक्रम दाखवला आणि ऐकवला जाईल. यासाठी ई-निविदा प्रसिद्ध करून संस्थेची निवड करण्याची प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.