TOD Marathi

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नावाची आज अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी सत्ताधारी व विरोधी बाकांवरच्या प्रमुख नेत्यांनी त्यांचं अभिनंदन करणारी भाषणं केली. तसेच, राजकीय टोलेबाजीनं सभागृहात अनेकदा हशा पिकल्याचंही पाहायला मिळालं. मात्र. या राजकीय टोलेबाजीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या काळातील अधिवेशनाच्या कामकाजाचा यावेळी उल्लेख केला.

“२०१४ च्या शेवटच्या टप्प्यात विखे पाटील जेव्हा विरोधी पक्षनेते असताना आमच्याकडे आले, तेव्हा वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाले. छोटा काळ होता. एकच अधिवेशन त्यांना मिळालं. पण त्याही अधिवेशनात त्यांनी आपली छाप पाडण्याचा प्रयत्न केला”, असं फडणवीस यावेळी म्हणाले.

हेही वाचा” …‘मोदी’ आडनावावरील वक्तव्याबद्दल मी माफी मागणार नाही- राहुल गांधी”

दरम्यान, यावेळी बोलताना फडणवीसांनी विजय वडेट्टीवार यांना उद्धव ठाकरे सरकारमध्ये चांगलं खातं मिळालं नसल्याचं म्हटलं. “विरोधी पक्षनेता म्हणून चांगलं काम केल्यानंतर नवीन मंत्रीमंडळात वडेट्टीवारांना चांगलं खातं मिळेल असं वाटत होतं. खाती सगळी चांगलीच असतात. पण तरी ज्येष्ठतेनुसार काही खाती असतात. तसं खातं त्यांना मिळालं नाही. मग आम्हाला बातम्या वाचायला मिळाल्या की वडेट्टीवार नाराज आहेत. मग वाचायला मिळालं की नाना पटोले आता मंत्री होत आहेत आणि वडेट्टीवार अध्यक्ष होतील. अशा बातम्या होत्या. पण शेवटी वडेट्टीवार यांनी आपत्ती व्यवस्थापन खात्याचा कारभार सांभाळला”, असं फडणवीस म्हणाले.

“मी आपल्याला आश्वस्त करतो की विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही ज्या ज्या गोष्टी मांडाल, राज्याच्या वतीने आम्ही कुणीही उत्तर देताना सकारात्मक उत्तर देऊ. मी अडीच वर्षं विरोधी पक्षनेता होतो. मी पोटतिडकीनं भाषण करायचो. पण उत्तर शिवाजी पार्कहून यायचं. विधानसभेतलं उत्तरच मिळत नव्हतं. विधानसभेत शिवाजी पार्कचं उत्तर मिळायचं. त्यामुळे आता तसं होणार नाही”, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला लगावला.