TOD Marathi

MPSC ची राज्यसेवा Exam पास होऊन निवड झालेल्यांना नियुक्ती द्या, SIO ची CM यांच्याकडे मागणी, जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

टिओडी मराठी, पुणे, दि. 30 जून 2021 – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी राज्यसेवा परीक्षा पास होऊन उप जिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, तहसीलदार अशा पदांवर निवड झालेल्या उमेदवारांची / विद्यार्थ्यांची 1 वर्षापासून रखडलेल्या नियुक्ती आणि नियुक्तीपत्र त्यांना लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशन (SIO)च्या महाराष्ट्र उत्तर विभागाचे अध्यक्ष तारीक जकी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी संबंधित जिल्हाधिकारी यांना दिले.

या निवेदनात त्यांनी म्हंटलं आहे कि, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा 2019 परीक्षा 413 पदांसाठी परीक्षा घेतली आहे. या परीक्षेचा अंतिम निकाल 19 जून 2020 रोजी लागून 1 वर्ष झाले आहे.

या परीक्षेत पास होऊन निवड झालेले उप जिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, तहसीलदार आदींना नियुक्ती मिळालेली नाही. राज्य सरकार या उमेदवारांना नियुक्ती देण्याबाबत उदासीनता दाखवत आहे, असे आढळत आहे.

त्यामुळे या उमेदवारांचे / विद्यार्थ्यांचे मेहनत घेऊन 5-6 वर्ष अभ्यास करून सरकारी सेवेत रुजू होण्याचे स्वप्न हे स्वप्न राहण्याचे चिन्ह दिसत आहे.
बहुतांशी उमेदवारांचे / विद्यार्थ्यांचे आई वडील हे शेतकरी, शेतमजूर, कामगार असे आहेत.

आज देशात शेतकरी आत्महत्या करत असताना त्यांनी कष्ट करून सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी जीवाचे रान करून आभ्यास केला आहे. तसेच नियमानुसार उप जिल्हाधिकारी, पोलिस उप अधीक्षक, तहसीलदार अशा पदांसाठी निवड घेतली आहे. अशाना राज्य सरकारने त्वरित नियुक्ती दिली पाहिजे.

तरीही शासन त्यांना नियुक्ती का देत नाही? यामुळे त्यांना प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. या नियुक्तीबाबत सुप्रीम कोर्टानेही निर्णय दिला आहे. त्यामुळे याबाबत स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशन महाराष्ट्र उत्तर विभागाच्या वतीने विविध ठिकाणी प्रत्येक जिल्हा आणि तालुकास्तरावर निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिली जात आहेत.

तसेच यातून राज्य सरकारने वेळ न घालवता निवड झाल्यानं त्वरित नियुक्तीपत्र लवकरात लवकर द्यावीत, अशी मागणी केली जात आहे, अशी माहिती स्टुडंट्स इस्लामिक अर्गनायझेशनचे मीडिया सचिव शोएब आसिम यांनी दिली आहे.