TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 17 जुलै 2021 – भारतच्या नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. नौदलाने ‘MH-60R’ (रोमियो) या दोन हेलिकॉप्टरची पहिली तुकडी अमेरिकेच्या नौदलाकडून सॅन दिएगो येथे नॉर्थ आयलंडवरील नौदलाच्या तळावर समारंभपूर्वक स्वीकारलीय. या समारंभाद्वारे या हेलिकॉप्टरचे अमेरिकी नौदलाकडून भारतीय नौदलाकडे अधिकृत हस्तांतरण झाले आहे.

भारताचे अमेरिकेतील राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी नौदलाच्या वतीने ही हेलिकॉप्टर्स स्वीकारली आहेत. या समारंभामध्ये अमेरिकी नौदलाच्या हवाई दलाचे कमांडर वाईस ऍडमिरल केनेथ व्हिटसेल यांनी या हेलिकॉप्टरची कागदपत्रे भारतीय नौदलाचे उपनौदलप्रमुख वाईस ऍडमिरल रवनीत सिंग यांच्याकडे सुपूर्द केलीत.

MH-60R या हेलिकॉप्टर्सचे उत्पादन लॉकहीड मार्टीन कॉर्पोरेशन या अमेरिकी कंपनीने केलं आहे. सर्व प्रकारच्या हवामानामध्ये विविध प्रकारच्या मोहिमांमध्ये काम करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक एवियॉनिक्स/सेन्सर्सचा वापर करून त्यांची रचना केलीय. अशा प्रकारच्या 24 हेलिकॉप्टर्सची खरेदी अमेरिकेकडून केली जातेय.

या हेलिकॉप्टरमध्ये विविध प्रकारची भारतीय सामग्री व शस्त्रे बसवण्यासाठी सुधारणा हि केली जाणार आहे. MH-60r या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय नौदलाच्या त्रिमितीय क्षमतेत वाढ होणार आहे.

या हेलिकॉप्टरचा त्यांच्या क्षमतेनुसार वापर करता यावा, यासाठी कर्मचाऱ्यांच्या पहिल्या तुकडीचे सध्या अमेरिकेमध्ये प्रशिक्षण सुरू आहे.

हेलिकॉप्टरची तांत्रिक माहिती :
MH-60R या हेलिकॉप्टरचा सर्वाधिक वेग 267 किलोमीटर प्रति तास इतका आहे. हे हेलिकॉप्टर एकाचवेळी 834 किलोमीटरपर्यंत प्रवास करते. तसेच याचे वजन 6 हजार 895 किलोग्राम आहे.

तर याची क्षमता 10 हजार 659 किलोग्राम वजन नेण्याची आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया, डेन्मार्क, सौदी अरब यांच्याकडेही अशा प्रकारचे हेलिकॉप्टर आहे.