TOD Marathi

मुंबई :  राज्यात सत्तांतर झालं आणि शिवसेनेतील ४० आमदार एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गोटात सहभागी झाले. मात्र सत्ता गमावल्यानंतर शिवसेनेने विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद ( Vidhan Parishad Opposition Leader ) मिळवण्यासाठी हालचालींना सुरुवात केली आहे. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर मराठवाड्यातील शिवसेना नेते अंबादास दानवे यांची वर्णी लावावी असं पत्र शिवसेनेने विधान परिषदेच्या सभापतींना पाठवलं आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर महाविकास आघाडीतील काँग्रेससह शिवसेनेनेही दावा सांगितला होता. मात्र शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या सहीने विधान परिषद सभापतींना पत्र लिहित मराठवाड्यातील अंबादास दानवे यांची विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर वर्णी लावावी, अशी शिफारस केली आहे.

विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते मिळावं यासाठी शिवसेनेत आमदार अंबादास दानवे यांच्याबरोबर सचिन अहिर, डॉ. मनीषा कायंदे इच्छुक होत्या. एका औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात जाणं पसंत केलं. औरंगाबाद तसा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र तिथेच उद्धव ठाकरेंना जोरदार दणका बसला. अशा परिस्थितीत अंबादास दानवे यांना विरोधी पक्षनेतेपदी संधी देऊन मराठवाड्यात अंबादास दानवेंच्या रुपाने शिवसेनेला बळ देण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न आहे.