TOD Marathi

मुंबई | राज्यात सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. आधी देवेंद्र फडणवीसांनी १९७८च्या पुलोदच्या प्रयोगावरून शरद पवारांना लक्ष्य केलं. त्यानंतर पहाटेच्या शपथविधीआधी शरद पवारांबरोबर बैठक झाली होती, असं फडणवीस म्हणाले. त्यावर शरद पवारांकडूनही टोलेबाजी झाली. यानंतर अजित पवारांनी राज्य सरकारनं वर्षभरात चांगली कामगिरी करणं अपेक्षित होतं, अशी टीका केली असताना त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खोचक प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप-शिवसेना युती सरकारची आज वर्षपूर्ती होत असून यानिमित्ताने ठाण्याच्या आनंद मठात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी स्वत: एकनाथ शिंदे तिथे उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

हेही वाचा” …भारत विरुद्ध पाकिस्तान सामना, अहमदाबादमधील हॉटेल्स फुल; एका रुमचे भाडे ‘एवढ्या’ लाखांपर्यंत”

यावेळी शिंदेंनी शरद पवारांचं नाव घेऊन अजित पवारांना लक्ष्य केलं. “विरोधी पक्षनेत्याचं काम काय असतं? सरकारला चांगलं म्हणण्याचं काम असतं का? विरोधी पक्षनेत्याचं काम त्यांना करू द्या. सरकार म्हणून आम्हाला आमचं काम करू द्या. विरोधी पक्षनेते मनातून बोलत नाहीयेत. त्यांना विरोधी पक्षनेते म्हणून बोलावं लागतंय म्हणून ते बोलतायत. कारण सत्तास्थापनेवेळी शरद पवारांनी काय केलं याची आठवण त्यांना आहे”, असं एकनाथ शिंदें म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांना क्लीन बोल्ड वगैरे केल्याचं शरद पवार म्हणाले. पण त्यांनी क्लीन बोल्ड अजित पवारांनाच केलंय. हे अजित पवारांना माहितीये. अजित पवार ते विसरणार नाहीत. तेव्हा एकाच वेळी अनेकांशी बोलणी सुरू होती, हेच शरद पवारांनी मान्य केलंय”, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.