TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 12 जून 2021 – कोरोनाने पर्यटकांमुळे बंद असलेला युरोप आता हळूहळू उघडत असून सुमारे एक वर्षानतंर युरोपात अमेरिका व इतर देशांच्या पर्यटकांसाठी अनलॉकची प्रक्रिया सुरू झालीय. मात्र, पर्यटकांना काही नियमांची काळजी घ्यावी लागणार आहे. इंग्लंड बहुतांश लोकांच्या लसीकरणानंतर पूर्णपणे अनलॉकच्या स्थितीत आलाय. 21 जूनपासून ब्रिटनला पूर्णपणे अनलॉक करण्याची बोरीस जॉन्सन सरकारची योजना आहे. युरोपातील 30 पैकी 20 देश अनलॉक होणार आहेत.

युरोप मागील वर्षी कोरोनाचा हॉटस्पॉट होता. कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या इटली, स्पेन आणि फ्रान्समध्ये हॉटेल, रेस्टॉरंट, पर्यटनस्थळ व आंतरराष्ट्रीय प्रवास काही नियमांसह खुले केले जात आहेत.

एका आठवड्यात बहुतांश देशात मुख्य व्यवहार सुरू होणार आहेत. मार्च 2020 मध्ये पहिल्यांदा युरोपीय संघाचे दरवाजे कोरोनामुळे बंद केले होते.

ग्रीसमध्ये लसीकरण गरजेचे :
पर्यटनावर अवलंबून असलेल्या ग्रीसने एप्रिलमध्ये अमेरिकी प्रवाशांसाठी सीमा खुल्या करणे सुरू केले होते. आता चीन, ब्रिटन आणि 20 इतर देशांतील लोकांना परवानगी दिलीय. सर्वांना लसीकरण प्रमाणपत्र किंवा आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवाल देण्याचा नियम केला आहे. मात्र, हे निर्देश 14 जूनला समाप्त होत असले तरी ते वाढवले जाऊ शकतात.

युरोपतात हवे डिजिटल ट्रॅव्हल प्रमाणपत्र :
युरोपीय संघाचे कोणतेही कोविड पर्यटन नाही. मात्र, ज्यांचे लसीकरण झाले आहे त्या लोकांसाठी एक संयुक्त डिजिटल प्रवास प्रमाणपत्रावर काम सुरूय. स्पेन, जर्मनी, ग्रीस, बुल्गारिया, क्रोएशिया, चेक गणराज्य, डेन्मार्क, पोलंडने संयुक्त डिजिटल प्रवास प्रमाणपत्र प्रणालीचा वापर सुरू केलाय.

इटलीत कोरोना चाचणी आणि क्वॉरंटाइन सिस्टिम :
अमेरिकेसाठी इटली मे मध्यातच उघडला आहे, मात्र, येथे आल्यावर 10 दिवसांसाठी क्व़ॉरंटाइन राहण्याचा नियम केला आहे. येथे येण्याआधी त्यांची कोरोना चाचणी हवी. इटलीने गेल्या महिन्यात ब्रिटन व इस्त्रायलच्या पर्यटकांनाही परवानगी देणे सुरू केलं आहे.

ब्रिटनमध्ये 10 दिवस विलगीकरण :
सध्या ब्रिटनमध्ये मोजके अमेरिकी पर्यटक येत आहेत. येथे येणाऱ्यांना 10 दिवसांचे विलगीकरण बंधनकारक केलं आहे. अमेरिकेशी उड्डाणसेवा सुरू करण्यासाठी चर्चा सुरूय. पंतप्रधान बोरीस जॉन्सन हे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी जी 7 बैठकीमध्ये चर्चा करू शकतात.

मंजुर लस घेतलेल्यांना फ्रान्सची परवानगी :
फ्रान्सने भारत, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलसह 16 देशांच्या पर्यटकांवर बंदी घातली आहे, तर लस घेतलेल्यांना परवानगी दिलीय. मात्र, युरोपीय संघाने मंजुरी दिलेली लस असावी. फ्रान्सच्या सीमा बुधवारी पुन्हा उघडल्यात. युरोपबाहेर आणि इतर देशांतील लोकांना आरटीपीसीआर निगेटिव्ह अहवालासह येण्याची परवानगी आहे.

स्पेनमध्ये भारतीयांना बंदी :
सोमवारी अमेरिका व बहुतांश देशातील लस घेतलेल्या लोकांना येण्याची परवानगी दिली आहे. डब्ल्यूएचओकडून मंजूर व चीनच्या दोन लसी घेतलेल्यांनाही येण्याची परवानगी दिली. भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्यांवर अजूनही बंदी लागू आहे.